बॉलीवूड अभिनेता इम्रान खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर खानचा भाचा व अभिनेता इम्रान मागच्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता. त्याला रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अभिनय क्षेत्राबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही इम्रानने अगदी स्पष्टपणे अनेक मुलाखतींमध्ये सांगितल्या आहेत. अलीकडेच इम्रानने तो लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याचं सांगितलं होतं आणि आता त्याच्या गर्लफ्रेंड लेखानं त्यांचं रिलेशनशिप अधिकृतरित्या जाहीर केलं आहे.

लेखाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पहिल्यांदाच दोघांचा फोटो शेअर केला आहे. निळ्याशार समुद्राच्या किनारी दोघंही एकमेकांकडे बघत रोमॅंटिक पोज देत उभे आहेत असं या फोटोमध्ये दिसतंय. या फोटोमध्ये दोघांचा चेहरा दिसत नसला तरी यात ते सहजरित्या ओळखले जातायत.

इम्रानने त्याच्या आणि लेखाच्या डेटिंगबद्दल सांगितल्यानंतर सोशल मीडियावर या कपलची ही पहिलीच अधिकृत पोस्ट आहे.

नुकत्याच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने लेखाला डेट करायला कशी सुरुवात केली याबद्दल सांगितलं. इम्रान म्हणाला, “माझ्या भूतकाळामुळे, माझं आधीचं लग्न आणि घटस्फोट या सगळ्यांमध्ये मी नेहमीच माझ्या आणि लेखाच्या नात्याला सांभाळायचा प्रयत्न केलाय. एका नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठी मी नेहमीच जपून पावलं उचलली आहेत. मी माझ्या या नात्याला लोकांपासून जपूनच ठेवत होतो.”

हेही वाचा… राखी सावंतच्या आजारपणावर आदिल खानचा संशय; म्हणाला, “कोर्टाची तारीख जवळ येतेय म्हणून…”

लेखाबद्दल सांगताना इम्रान म्हणाला, “माझ्या आयुष्यात एक व्यक्ती म्हणून लेखाचा खूप सकारात्मक आणि निरोगी प्रभाव राहिला आहे. ती खूप काळजी घेणारी, आधार देणारी आणि प्रेम करणारी आहे. तिने माझी खूप मदत केली आहे. जेव्हा मी नैराश्याच्या विळख्यात अडकलो होतो आणि स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तिने मला खूप सपोर्ट केला. जर ती नसती तर मी हा प्रवास कसा करू शकलो असतो हे मलाच माहीत नाही.”

या जोडप्याने मुंबईत एकत्र भाड्याने घर घेतल्याचे वृत्त आहे. मनी कंट्रोलनुसार, इम्रान आणि लेखाने दिग्दर्शक करण जोहरकडून शहरातील वांद्रे भागातील अपार्टमेंट भाडेतत्त्वावर घेतलं आहे. अपार्टमेंटचे भाडे नऊ लाख प्रति महिना आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला उरले शेवटचे फक्त ४८ तास; दोघं काय घेणार निर्णय? पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, इम्रानने यापूर्वी २०११ मध्ये अवंतिका मलिकबरोबर लग्न केलं होतं, परंतु काही कारणास्तव २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना इमारा नावाची एक मुलगीदेखील आहे.