राखी सावंतची प्रकृती ठीक नसल्याने मंगळवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश याच्या म्हणण्यानुसार तिच्या छातीत आणि पोटात दुखू लागल्यानं तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं. “डॉक्टरांना तिच्या गर्भाशयात ट्यूमर सापडला आहे आणि हा कर्करोग असावा, असा संशयदेखील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे,” असे रितेशने माध्यमांना सांगितले होते.
राखी चर्चेत राहण्यासाठी अनेक पब्लिसिटी स्टंट करीत असते. तिचं आजारपण हे खोटं असू शकतं किंवा हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो, असं बहुतेक लोकांचे म्हणणे आहे. परंतु, तिची तब्येत खरोखरच क्रिटिकल आहे, असे रितेशने स्पष्ट केलेय. अशा वेळेस राखीचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान याने तिच्यावर संशय व्यक्त करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हेही वाचा… राखी सावंत रुग्णालयात दाखल; हृदयाशी संबंधित आजारामुळे बिघडली प्रकृती; फोटो व्हायरल
आदिलने शेअर केलेल्या व्हिडीओत तो म्हणाला, “मी बातमी बघत होतो की, राखीला हृदयाशी संबंधित काही आजार झाला आहे आणि तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी सांगितलंय की, राखीला कर्करोग होण्याचीदेखील शक्यता आहे.”
आदिल पुढे म्हणाला, “जेव्हा मी वर्षभराआधी तिच्या सगळ्या टेस्ट केलेल्या आणि मी तिची एक शस्त्रक्रियासुद्धा करून घेतली होती. तेव्हा तिची तब्येत अगदी उत्तम होती. तिला काहीच अशी समस्या नव्हती.”
“असो! कोर्टाची तारीख जवळ येतेय. जर ती काही पब्लिसिटी स्टंट करीत असेल, तर कोर्ट, जनता प्रत्येक माणूस तिला बघतोय. यापेक्षा जास्त घृणास्पद गोष्ट नसू शकते. जर ती खरंच आजारी असेल, तर मी मनापासून प्रार्थना करतो की ती लवकर बरी व्हावी,” असंही आदिल म्हणाला.
“सगळ्यात आधी मी एक चांगला माणूस आहे. मला कोणाचं वाईट करायचं नाही आहे. तुझ्या सरेंडरची वेळ जवळ आलीय आणि ती तारीख कॅलेंडरपेक्षा मी हाताच्या बोटांवर मोजतोय, की चार आठवडे कधी संपतील. म्हणून आता जर रुग्णालयाचं हे नाटक आहे किंवा काही पब्लिसिटी स्टंट आहे की खरंच तिला कोणता आजार झालाय हे मला माहीत नाही. मी डॉक्टरांचा रिझल्ट येण्याची वाट बघतोय,” असं आदिलने नमूद केलं.
दरम्यान, गेल्या वर्षी राखीने आदिलबरोबर लग्न केल्याची जाहीर घोषणा केली होती. तर काही आठवड्यांनंतरच तिने त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने त्याच्यावर घरगुती हिंसाचार, निधीची गैरवापर आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आदिलला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटकही करण्यात आली होती.