‘सिलसिला’मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन व रेखा यांनी एकत्र काम केलं होतं. अमिताभ बच्चन व जया यांनी रेखाबरोबर केलेला हा शेवटचा चित्रपट होता. पण ‘सिलसिला’ चित्रपटात काम करण्यासाठी जया बच्चन यांची दिग्दर्शक यश चोप्रा यांना एका अभिनेत्याची मदत घ्यावी लागली होती. कारण आधीच अमिताभ व रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. त्याचबरोबर चित्रपटाची कथाही अशी होती, जणू ती या तिघांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली आहे.

जया बच्चन यांनी चित्रपटासाठी होकार द्यावा, यासाठी यश चोप्रा यांनी संजीव कुमारशी संपर्क साधला होता. हनीफ झवेरी आणि संजीव यांची भाची जिग्ना यांनी याबद्दल विकी लालवानीशी बोलताना सांगितलं.

जया बच्चन यांनी ठेवलेली अट

“यश चोप्रा यांना माहित होतं की संजीव कुमार जया यांना बहीण मानतात, म्हणून त्यांनी संजीव यांना जया यांच्याशी बोलायला सांगितलं. जया सिलसिला करायला तयार झाल्या, पण एक अट ठेवली. त्या म्हणाल्या की ‘मी सेटवर पूर्णवेळ हजर असेन, माझे सीन नसतानाही’,” असं हनीफ झवेरी म्हणाले. ही अट रेखामुळे ठेवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आधी स्मिता पाटील आणि परवीन बाबी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर या चित्रपटात काम करणार होत्या. “अमिताभ आणि रेखा यांना आधीच घेण्यात आलं होतं, पण यश चोप्रा यांना जया बच्चन हव्या होत्या आणि त्या तयार नव्हत्या. पण संजीव यांनी हा चित्रपट करायला जया यांची मनधरणी केली,” असं हनीफ म्हणाले.

अमिताभ बच्चन रेखा यांना पाहिलं अन्…

त्याकाळी अफेअरमुळे अमिताभ बच्चन खूप चर्चेत असायचे. एकेकाळी बच्चन कुटुंबाचे खूप जवळचे मित्र असलेले अमर सिंग यांनी रेखा: द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकाचे लेखक यासर उस्मान यांना काही गोष्टी सांगितल्या होत्या. “एकदा शबाना आझमींनी आम्हाला त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण दिले होते. मी जया आणि अमिताभसह त्यांच्या घरी पोहोचलो. आम्ही वेळेवर पोहोचलो आणि अमिताभ यांनी त्यांच्या ड्रायव्हरला जेवायला सांगितलं कारण त्यांना बराच वेळ लागणार होता. आत पोहोचल्यावर आम्हाला दिसलं की रेखा आधीच तिथे होत्या. अमितजींनी रेखाला पाहिलं आणि ते लगेच बाहेर आले,” असं ते म्हणाले होते.