Kajol’s Money Mindset: काजोल व अजय देवगण ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. अजय देवगण काही दिवसांपूर्वी ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
काजोलची प्रमुख भूमिका असलेला ‘माँ’ चित्रपट २७ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता अभिनेत्री काजोल मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
काजोल काय म्हणालेली?
काजोलने पती अजय देवगणसह ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करण जोहरने अजय देवगणला प्रश्न विचारलेला की, काजोल तिच्या स्वत:साठी अजिबात पैसे खर्च करत नाही. ती बॉलीवूडमधील मोठी स्टार आहे. या इंडस्ट्रीमध्ये खूप पैसे कमावले जातात आणि खूप पैसे खर्च केले जातात. तर माझा अजयसाठी प्रश्न आहे की, काजोल तिच्या पैशांचे काय करते? कारण- मी तिच्याकडे कधीही डिझायनर बॅग्ज पाहिल्या नाहीत. पण, तिच्याकडे विचित्र ब्रँडच्या वस्तू असतात, ज्याचे नाव मी कधीच ऐकलेले नसते. करण जोहरच्या या प्रश्नावर अजय देवगण गमतीने म्हणाला होता की, ती सांताक्रूझ मार्केटमधून खरेदी करते. सध्या ती ऑनलाइन शॉपिंगकडे वळली आहे. दररोज ७-८ पार्सल घरी येत असलेले मी पाहतो.
जेव्हा करण जोहरने त्या पार्सलची किंमत काय असते, असे विचारले, तेव्हा अजय देवगण म्हणालेला, “५००, ६००, ७००, १२०० अशी त्या वस्तूंची किंमत असते. ती म्हणते की, ही वस्तू खूप छान आहे आणि फक्त ६०० रुपयांना आहे. त्यानंतर ती वस्तू ती खरेदी करते.”
त्याबाबत काजोल म्हणालेली, “जेव्हा कार्यक्रम असतात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जाताना मी महागड्या गोष्टी वापरते. पण, मला असं वाटतं की, मी जे कपडे परिधान करते, वस्तू माझ्याबरोबर असतात, त्यामध्ये मला सहजता वाटली पाहिजे. त्यामुळे महागडे कपडे, वस्तू यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा मी माझे पैसे फिक्स डिपॉझिट(FD) मध्ये ठेवण्यास प्राधान्य देते.”
पुढे काजोल अजय देवगणला म्हणालेली, “मी अनावश्यक पैसे खर्च करीत नाही. त्यासाठी तू कृतज्ञ असायला हवेस.” त्यावर अजय देवगण म्हणालेला की, मी कृतज्ञ आहे.
आर्थिक गुंतवणुकीबाबत पीकअल्फा इन्व्हेस्टमेंट्सच्या असोसिएट व्हाइस-प्रेसिडेंट, सीएफए(CFA), अपर्णा मुंडानी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना म्हणाल्या, “आर्थिक गुंतवणुक करणे हे आर्थिक स्वातंत्र्याकडे एक पाऊल टाकल्यासारखे आहे. तुमच्या पगारातील काही पैसे हे गुंतवणुकीसाठी काढून ठेवा.
त्या असेही म्हणाल्या, “आपण कशासाठी आणि कोणत्या गोष्टींसाठी खर्च करीत आहोत याची जर जाणीव असेल, तर आपण अनावश्यक खर्च करण्यापासून स्वत:ला रोखू शकतो. ऑनलाइन शॉ़पिंग करीत असताना जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करावी, असे वाटते, तेव्हा एक आठवडाभर ती कार्टमध्ये ठेवा. त्यानंतरही तुम्हाला त्या वस्तूची गरज आहे, असे वाटत असेल तेव्हा ती खरेदी करा.
लोकांच्या खरेदी करण्याच्या मानसिकतेबाबत एमपॉवर( Mpower) येथील मानसशास्त्रज्ञ हेमांगी म्हाप्रोळकर म्हणाल्या की, लोक त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, समवयस्कांना दाखवण्यासाठी वस्तू खरेदी करतात. त्यातून त्यांना आदर मिळावा, त्यांचे कौतुक व्हावे, अशी त्यांना अपेक्षा असते. त्यामुळेदेखील अनावश्यक गोष्टींवर खर्च होतो. याबरोबरच ई-कॉमर्स, सोशल मीडिया यांमुळे पैशाने काहीही मिळवता येऊ शकते, ही धारणा वाढली आहे.