Kalki Koechlin reveals Divorce with Anurag Kashyap was bitter: अभिनेत्री कल्की कोचलिन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी २०११ साली लग्नगाठ बांधली होती. त्याआधी त्यांनी देव डी या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. शेवटी त्यांनी २०१५ साली घटस्फोट घेतला.

“ते एकमेकांचा तिरस्कार करायचे”

आता अभिनेत्री कल्की कोचलिनने नुकताच ‘झूम’शी संवाद साधला. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मी १३ वर्षांची असताना माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी घरातील वातावरण अत्यंत वाईट होतं. ते खरोखरच एकमेकांसाठी वाईट होते. ते एकमेकांचा तिरस्कार करायचे. मी त्या काळात मोठे झाले. तो कठीण काळ होता. कदाचित त्यांच्या घटस्फोटाचा परिणाम माझ्या मनावर इतका झाला की माझाही घटस्फोट त्यामुळे झाला असावा.”

पुढे कल्की असेही म्हणाली, “माझ्या घरात फार वाईट वातावरण होते. मी माझ्या आई-वडिलांना वेगळे होताना पाहिले होते. त्यामुळे नाती तुटतात, ही गोष्ट मला खूप सामान्य वाटू लागली, कारण मी ते माझ्या खूप लहान वयातच पाहिले होते. माझे पालक वेगळे होताना एकमेकांचा तिरस्कार करताना मी पाहिले आहे. अशा घटनांमुळे वाईट परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकत नाही, असे वाटू लागले. स्वत:वरचा विश्वास कमी होतो. पण, मी उपचार घेतले, थेरपी घेतली, त्यामुळे मला त्यावर मात करता आली.”

अनुराग कश्यपबरोबर घटस्फोट झाल्यानंतर त्याला इतर कोणत्या महिलेबरोबर पाहणे कठीण होते, असाही खुलासा अभिनेत्रीने केला. कल्की म्हणाली, “घटस्फोटानंतरची पहिली काही वर्षे आमच्यासाठी सोपी नव्हती. एक वेळ अशी आली, जेव्हा आम्ही एकमेकांच्या आयुष्यापासून दूर राहायला पाहिजे याची जाणीव झाली. एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होण्यास काही वर्षांचा कालावधी गेला. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, देशात राहत असल्यानेदेखील त्याचीदेखील आम्हाला मदत झाली. आता आम्ही अशा ठिकाणी आहोत की कधीतरी उत्तम पद्धतीने एकमेकांना भेटू शकतो.”

कल्कीने गेल्या वर्षी अनुराग व त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कल्कीच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने अनुराग कश्यपच्या देव डी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिची यह जवानी है दिवाणी या चित्रपटातील भूमिकादेखील चांगलीच गाजली होती. या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले होते.