सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असतानाच आता समोर आलेल्या एका नव्या बातमीमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा या तीन सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमक्यांमुळे बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे.

फ्री प्रेस जनरलला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-मेलने पाठवलेल्या धमकीच्या संदेशांमध्ये या सेलिब्रिटींचे कुटुंबीय आणि जवळच्या सहकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. राजपाल यादव आणि रेमो या कलाकारांनी या संदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राजपाल यादवच्या पत्नीच्या तक्रारीवरून, अंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीएनएसच्या कलम ३५१(३) अंतर्गत एफआयआर दाखल केला.

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून हे ई-मेल पाकिस्तानातून आले आहेत असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. don99284@gmail.com या ई-मेल पत्त्यावर सेलिब्रिटींना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. मेल पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख ‘विष्णु’ अशी करून दिली आहे. ई-मेलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, संबंधित व्यक्ती सेलिब्रिटींच्या अलीकडील हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ही संवेदनशील बाब असून हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही हा संदेश गांभीर्याने घ्या आणि गोपनीयता ठेवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा ई-मेलमध्ये देण्यात आला होता. तसेच आठ तासांच्या आत प्रतिसाद देण्याची मागणी करण्यात आली होती. जर आम्हाला कोणतंही उत्तर मिळालं नाही, तर आम्ही असं गृहीत धरू की, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही आणि आम्ही आवश्यक ती कारवाई करू, विष्णू… असं या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एपी ढिल्लन, सलमान आणि शाहरुख खान यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.