बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar) आणि ‘बडे अच्छे लगते है’ या सिनेमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता राम कपूर हे त्यांच्या घटलेल्या वजनामुळे मोठ्या चर्चेत होते. राम कपूरच्या प्रकृतीत मोठा फरक जाणवला. त्यानंतर त्याच्या घटलेल्या वजनाची मोठी चर्चादेखील झाली. ओझेम्पिक हे औषध घेऊन या कलाकारांनी त्यांचे वजन घटवले आहे,असेही म्हटले गेले. आता पुन्हा एकदा यावर चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे कपिल शर्मा(Kapil Sharma)नेदेखील वजन घटवल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच कपिल शर्माचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कपिल शर्माने घटवले वजन
सोशल मीडियावर कपिल शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कपिल शर्माचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे वजन कमी झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “कपिल शर्माने किती वजन कमी केले आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “त्याची प्रकृती ठीक नसल्याचे दिसत आहे.” तर एकाने कपिल शर्मा व करण जोहर यांची तुलना केली. चाहत्याने या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट करीत लिहिले, “बॉलीवूडमध्ये नवीन ट्रेंड आला आहे. सर्व जण बारीक होत आहेत. आधी करण जोहर आणि आता कपिल शर्मा.” तर अनेकांनी तो ओझेम्पिक हे औषध घेत असल्याचे कमेंटमध्ये लिहिले आहे.
याआधी करण जोहरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याचे वजन कमी झाल्याचे दिसत होते. त्याच्या फोटोंवरदेखील अनेकांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळाले. ‘इंडिया टुडे डिजिटल’शी संवाद साधताना तो ओझेम्पिक या औषधाचे सेवन करत आहे का, यावर त्याने स्पष्टीकरण दिले. करण जोहर म्हणाला होता की, निरोगी राहणे, योग्य खाणे, व्यायाम करणे, चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टींची काळजी घेतल्याने माझे वजन कमी झाले आहे. करण जोहरबरोबरच राम कपूरदेखील त्याच्या घटलेल्या वजनामुळे मोठ्या चर्चेत आला होता.





कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचे तर कपिल शर्मा हा भारतातील लोकप्रिय कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध आहे. कॉमेडी नाइट विथ कपिल, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांमुळे अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. सध्या तो नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसत आहे. अभिनेत्याचे जगभरात चाहते आहेत. तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याच्या शोमध्ये अनेक इतर लोकप्रिय कलाकारही काम करताना दिसतात. तसेच, बॉलीवूडमधील अनेक सेलेब्रिटी या शोमध्ये हजेरी लावताना दिसतात. त्याबरोबरच कपिल शर्माने काही चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच किस किस को प्यार करूँ २ या चित्रपटाची कपिल शर्माने घोषणा केली. किस किस को प्यार करूँ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाच्या सीक्वेलमधून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.