Know sources of Shah Rukh Khan and Juhi Chawla’s wealth: हुरुन संस्था दरवर्षी उद्योग, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण, याची यादी जाहीर करते. बुधवारी म्हणजेच १ ऑक्टोबर २०२५ ला या वर्षीची ‘रिच इंडिया लिस्ट’ हुरुन संस्थेने जाहीर केली आहे.
शाहरुख खान ठरला सर्वात श्रीमंत अभिनेता
मनोरंजन क्षेत्रात सर्वांत श्रीमंत अभिनेता शाहरुख खान ठरला आहे. अभिनेत्याची संपत्ती १२,४९० कोटी म्हणजेच १.४ अब्ज इतकी आहे. हुरुनने पहिल्यांदाच शाहरुख खानला अब्जाधीश म्हणून मान्यता दिली आहे.
या यादीत अभिनेत्री जुही चावला दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची संपत्ती ७,७९० कोटी आहे. अभिनेत्री या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असली तरी ती भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे. यामध्ये ती व तिचे पती जय मेहता यांच्या विविध उद्योग व व्यवसायांतून होणाऱ्या कमाईचा समावेश आहे.
हुरुन रिच इंडिया लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता हृतिक रोशन, चौथ्या क्रमांकावर करण जोहर व पाचव्या क्रमांकावर बच्चन कुटुंब आहे. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन यांच्या संपत्तीचा समावेश आहे. बॉलीवूडच्या या पाच श्रीमंत कलाकारांची एकूण संपत्ती २५,९५० कोटी इतकी आहे.
शाहरुख खान आणि जुही चावलाच्या संपत्तीत २०२४ च्या तुलनेत ‘इतकी’ वाढ
मात्र, तुम्हाला माहीत आहे का? गेल्या वर्षीसुद्धा शाहरुख खान व जुही चावला हे सर्वांत श्रीमंत कलाकारांच्या यादीत वरच्या स्थानावर होते. शाहरुख पहिल्या क्रमांकावर होता. २०२४ मध्ये त्याची संपत्ती ७,३०० कोटी इतकी होती. आता त्याची संपत्ती १२,४९० कोटी इतकी आहे. वर्षभरात ५,१९० कोटींची वाढ झाल्याचे दिसत आहे. किंग खानच्या या संपत्तीत फक्त त्याच्या अभिनयातून होणाऱ्या कमाईचाच वाटा नाही; तर, त्याची निर्मिती संस्था ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’चादेखील मोठा वाटा आहे. त्याबरोबरच तो आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या क्रिकेट संघाचा मालक आहे.
तर जुही चावलाची संपत्ती गेल्या वर्षी ४,६०० कोटी होती. आता ही संपत्ती ७,७९० कोटी इतकी आहे. अभिनेत्रीच्या संपत्तीत ३,१०० कोटींची वाढ झाली आहे. अभिनेत्रीच्या संपत्तीमध्ये तिच्या अभिनयाचा मोठा वाटा नाही. गेल्या १३ वर्षांत जुही चावलाचा एकही चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला नाही.
जुही चावला व तिचे पती जय मेहता यांचे विविध उद्योग व्यवसायाचा या संपत्तीमध्ये मोठा वाटा आहे. रेड चिलीज ग्रुपमध्ये आणि जुही चावला व्यावसायिक भागीदार आहेत. त्याबरोबरच आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या टीमचेदेखील शाहरुख खान, जुही चावला व तिचा पती जय मेहता हे भागीदार आहेत. जुहीचे पती जय मेहता उद्योजक असून त्यांच्याबरोबर तिने अनेक इतर कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, २०२५ च्या लिस्टमध्ये रणबीर कपूर, सलमान खान, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा यांना स्थान मिळाले नसल्याचे पाहायला मिळाले.