Madhuri Dixit Flop Movie : आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितच्या एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये ४-५ नाही तर तब्बल १० गाणी होती. १८ वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमातील गाणी खूप गाजली, मात्र चित्रपट फ्लॉप ठरला होता. लग्नानंतर काही वर्षांच्या ब्रेकनंतर माधुरीने या सिनेमातून पुनरागमन केलं होतं.

८० आणि ९० च्या दशकात, अनेक कलाकारांनी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकी काही काही काळानंतर मोठ्या पडद्यावरून गायब झाले. जेव्हा एखादा मोठा स्टार काही वर्षांच्या ब्रेकनंतर जेव्हा रुपेरी पडद्यावर परततो, तेव्हा त्याच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. निर्माते आणि दिग्दर्शक या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण दरवेळी प्रेक्षक स्टारला डोक्यावर घेतील असं नाही. माधुरी दीक्षितच्या कमबॅकवेळीही असंच घडलं होतं.

माधुरी दीक्षितच्या चित्रपटाचं नाव काय?

जेव्हा माधुरी दीक्षितचा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सर्वांनाच वाटलं होतं की ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करेल. पण त्याउलट घडलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला, परंतु त्यातील गाणी प्रचंड हिट झाली. या चित्रपटात १० गाणी होती, जी सर्वच प्रेक्षकांना भावली. पण त्यापैकी तीन गाणी तर अजूनही कानावर बडतात. माधुरी दीक्षितचा हा चित्रपट म्हणजे १८ वर्षांपूर्वी २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आजा नचले’ होय.

‘आजा नचले’चे दिग्दर्शन अनिल मेहता यांनी केले होते आणि आदित्य चोप्रा यांनी यशराज फिल्म्स बॅनरखाली निर्मिती केली होती. ‘आजा नचले’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नव्हती. या चित्रपटात माधुरी दीक्षितबरोबर अक्षय खन्ना, कोंकणा सेन शर्मा, कुणाल कपूर, जुगल हंसराज, विनय पाठक, रणवीर शौरी, दिव्या दत्ता, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रघुबीर यादव यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटातून माधुरी दीक्षित पाच वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतली होती. चित्रपटाचे संगीत सलीम-सुलेमान यांनी दिले होते. या सिनेमातील गाणी खूपच लोकप्रिय झाली होती.

आजा नचले मधील गाणी

माधुरी दीक्षितच्या चित्रपटातील ‘आजा नचले,’ ‘इश्क हुआ,’ ‘शो मी युवर जलवा,’ ओ रे पिया,’ आणि ‘इस पल,’ ही गाणी विशेष गाजली. यापैकी राहत फतेह अली खान यांचं ‘ओ रे पिया’ हे गाणं आजही सोशल मीडियावर चर्चेत असतं. त्याचबरोबर सुनिधी चौहानने गायलेलं ‘आजा नचले’ हे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलं होतं. या गाण्याला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं. माधुरीचा डान्स व अभिनय उत्तम होता, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता.

या चित्रपटात माधुरी दीक्षितने दिया श्रीवास्तव नावाच्या कोरिओग्राफरची भूमिका केली होती. जी न्यू यॉर्कहून तिच्या लहानशा गावात परतलले. अंदाजे २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने भारतात फक्त १४ कोटी आणि जगभरात अंदाजे २८ कोटी कमावले होते. पण तरीही या सिनेमाची गणना फ्लॉप चित्रपटात होते. IMDb वर या चित्रपटाला ६.२ रेटिंग मिळाले होते.