Madhuri Dixit & Husband Dr Shriram Nene Age Gap : माधुरी दीक्षितच्या अभिनयाचे व सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत. ‘धक धक गर्ल’ माधुरी ५८ वर्षांची आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आपल्या सौंदर्याने, नृत्य कौशल्याने व अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरीने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केलं, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

माधुरी दीक्षितच्या लग्नाला २६ वर्षे झाली आहेत. माधुरीने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर करून पती डॉ. नेनेंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये दोघांचेही लग्नाचे तसेच इतर अनेक जुने फोटो पाहायला मिळतात. या निमित्ताने माधुरी दीक्षित व डॉ. नेने यांच्या वयातील अंतर, दोघांची संपत्ती व पहिली भेट याबद्दल जाणून घेऊयात.

माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची पहिली भेट

माधुरी आणि श्रीराम नेने यांची ओळख तिच्या भावाने करून दिली होती. सुरुवातीला माधुरी श्रीराम यांना तयार नव्हती, पण नंतर भावाने समजावलं आणि तयार झाली. श्रीराम यांच्या साधेपणाने पहिल्याच भेटीत माधुरीचे मन जिंकले. दोघांनी १७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत एका साध्या समारंभात लग्न केले.

माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांच्या वयातील अंतर

श्रीराम नेनेंचा जन्म ११ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला, तर माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला होता. माधुरी दीक्षित पतीपेक्षा १६ महिन्यांनी लहान आहे. दोघांचं लग्न १७ ऑक्टोबर १९९९ रोजी झालं. या जोडप्याला दोन मुलं आहेत.

माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती

माधुरी दीक्षित ९० च्या दशकापासून सिनेविश्वात सक्रिय आहे आणि अहवालांनुसार तिची एकूण संपत्ती २५० कोटी रुपये आहे. तर डॉ. श्रीराम नेनेंची एकूण संपत्ती १०० ते १५० कोटी रुपये असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय.

करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने लग्न केलं आणि भारत सोडून पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली. डॉ. नेने तिथे डॉक्टर म्हणून काम करत होते. तर माधुरी संसारात रमली. नंतर दोघांना दोन मुलं झाली. त्यांच्या मुलांची नावं अरिन व रियान अशी आहेत. काही वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर माधुरी दीक्षिने भारतात परतायचा निर्णय घेतला. तिच्याबरोबर डॉ. नेनेही कायमस्वरुपी भारतात आले. आता माधुरी चित्रपट व रिअॅलिटी शो करतेय, तर डॉ. नेनेही इथे त्यांच्या क्षेत्रात काम करतायत.