बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन झालं आहे. ५६ वर्षीय शाहनवाज यांनी हृदयविकाराचा धक्का बसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांनी मिर्झापूर वेब सीरिजमध्ये अभिनेता अली फजलच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती.

मिळालेल्या माहितीनुसार शाहनवाज प्रधान एका कार्यक्रमात असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शाहनवाज यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रात दुःख व्यक्त केलं जात आहे. अभिनेते राजेश तैलंग यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा-“तो खेळला असता तर…”, एमसी स्टॅनवर टीका करणाऱ्यांना शिव ठाकरेचं उत्तर

“शाहनवाज भाई अखेरचा सलाम! तुम्ही एक उत्तम व्यक्ती आणि दमदार अभिनेते होता. मिर्झापूरच्या शूटिंगदरम्यान तुमच्याबरोबर खूपच चांगला वेळ व्यतित केला होता. आज तुम्ही या जगात नाही यावर विश्वास बसत नाही.” अशा शब्दात राजेश तैलंग यांनी शाहनवाज प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शाहनवाज प्रधान यांच्या पार्थिवावर उद्या १८ फेब्रुवारीला अंतिम संस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान १९९१ साली शाहनवाज यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबई गाठली होती. त्यांनी ‘जन से जनतंत्र तक’ या टीव्ही मालिकेतून पदार्पण केलं होतं. ‘श्री कृष्णा’ मालिकेत त्यांनी नंद बाबा यांची भूमिका साकारली होती. तर ‘अलिफ लैला’ मालिकेत सिंदबाद द सेलरची भूमिका त्यांनी साकारली होती. याशिवाय ते ‘ब्योमकेश बख्शी’, ‘तोता वेड्स मैना’, ‘बंधन सात जन्मों का’ आणि ‘सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर’ या मालिकांमध्येही दिसले होते. शाहनवाज यांनी ‘बैंगिस्तान’, शाहरुख खानचा ‘रईस’, एमएस धोनीचा बायोपिक आणि लोकप्रिय वेब सीरीज ‘मिर्झापूर’मध्येही काम केलं होतं.