‘गुलाबी साडी’ फेम लोकप्रिय गायक संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण सध्या ‘शेकी’ गाण्यावर “एक नंबर, तुझी कंबर…” म्हणत ठेका धरत आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरला सुद्धा आता ‘शेकी’ गाण्याची भुरळ पडली आहे. ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ मालिकेमुळे मृणाल घराघरांत लोकप्रिय झाली. टेलिव्हिजनविश्व गाजवल्यावर अभिनेत्री चित्रपटांकडे वळली. ‘सुपर ३०’ चित्रपटात मृणालने हृतिक रोशनबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यानंतर मृणालने ‘सीता रामम’, ‘हाय नाना’ अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. या चित्रपटांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. सध्याच्या घडीला तिला बॉलीवूडसह साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
मृणाल ठाकूल सध्या एका बॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त स्कॉटलंड येथे गेली आहे. याठिकाणी ती वरुण धवन आणि पूजा हेगडेसह चित्रीकरण करत आहे. शूटिंगमधून मोकळा वेळ मिळाल्यावर मृणाल स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली. लोकप्रिय कोरिओग्राफर लिप्सा आचार्य हिच्या सोबतीने मृणालने संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. याचा व्हिडीओ लिप्साने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
मृणालचा स्कॉटलंडमध्ये ‘शेकी’ या मराठी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला अवघ्या २ दिवसांत तब्बल ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. संजू राठोडने मृणालचा डान्स पाहून या व्हिडीओवर, “किती सुंदर…” अशी कमेंट केली आहे.
नेटकऱ्यांनी सुद्धा मृणालच्या डान्स व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, ‘शेकी’ गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, या गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. संजूच्या या नव्या गाण्यात हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणाऱ्या ईशा मालवीय झळकली आहे. यापूर्वी संजूची ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’, ‘नऊवारी साडी’ ही गाणी सुद्धा सोशल मीडियावर तुफान गाजली होती.