बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आला आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काल (२२ मे) एका महिलेने सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर त्या महिलेला अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.

अशातच आता मुंबई पोलिस सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढविण्याच्या विचारात आहेत. पी.टीआयच्या माहितीनुसार त्याच्या घरामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. घरातील सदस्यांच्या ओळखीशिवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ‘गॅलेक्सी’मध्ये प्रेवश मिळणार नाही. सलमान खानच्या सुरक्षेकरिता हे सर्व करण्यात येत आहे.

या आठवड्यात २२ मे रोजी एक महिला व पुरुष अशा दोघांना सलमानच्या घरातून अटक करण्यात आली. महिलेचं नाव ईशा छाब्रिया, तर पुरुषाचं नाव जितेंद्र सिंग असे होते. यादरम्यान, तेथील काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सलमानला धमकी देण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्याचं नियोजन केलं आहे. घरातील इतर सदस्यांच्या आयुष्यात व्यत्यय न आणता, गोपनीयता व सुरक्षितता यांच्यात संतुलन राखण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

सलमान खान राहतो ते गॅलेक्सी अपार्टमेंट नेहमी चर्चेत असतं. सलमानच्या या अपार्टमेंटवर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार झाला होता. त्या गोळीबारानंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली होती. अशातच आता वर्षभरानं एका महिलेनं त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, अशी बातमी समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच त्याचा ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री रश्मिका मंदाना व काजल अगरवाल झळकली होती. याव्यतिरिक्त तो सध्या त्याच्या दोन आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.