बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर काही ना काही कारणाने सतत चर्चेत असतात. त्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आणि टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी आजही या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान कायम राखलं आहे. नीना गुप्ता त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. आपल्या आयुष्यात बऱ्याच संघर्षांना सामोऱ्या गेलेल्या नीना गुप्ता नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बिनधास्तपणे बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना जुना किस्सा शेअर केला आहे.

नीना गुप्ता यांनी ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत १९८० च्या काळातील वर्क कल्चरवर भाष्य केलं. यावेळी त्यांना एक जुना किस्सा शेअर केला. एकदा एका दिग्दर्शकाने नीना यांना सर्वांसमोर शिव्या घातल्या होत्या. या प्रसंगानंतर नीना यांना सेटवरच रडू कोसळलं होतं. या मुलाखतीत जेव्हा नीना गुप्ता यांना त्यांच्या कारकिर्दीतील विचित्र प्रसंगाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी नीना यांनी हा धक्कादायक किस्सा सांगितला.

आणखी वाचा- “लोकांकडे पैसे…” बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर नीना गुप्तांनी केलं भाष्य

नीना गुप्ता म्हणाल्या, “मी एक चित्रपट करत होते. त्यात माझी खूपच छोटीशी भूमिका होती. एका सीनमध्ये माझे २-३ संवाद होते. पण शूटिंग करताना ते सीन्स काढून टाकण्यात आले. त्यानंतर या चित्रपटात माझी काही भूमिकाच उरली नाही. हे सगळं पाहून मी वैतागून दिग्दर्शकाकडे गेले आणि त्यांना म्हटलं की माझे दोनच संवाद होते. तेही आता तुम्ही काढून टाकले. त्यावर त्या दिग्दर्शकाने मला आई-बहिणीवर शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यावेळी सेटवर जुही चावला आणि विनोद खन्नाही होते. ज्या प्रकारे त्या दिग्दर्शकाने मला सर्वांसमोर शिव्या द्यायला सुरुवात केली ते पाहून मला खूप रडू आलं होतं.”

आणखी वाचा- “प्रसिद्ध निर्मात्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्…”; नीना गुप्तांनी सांगितलेला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा किस्सा सांगितल्यानंतर नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “आता पूर्वीपेक्षा खूपच वेगळी परिस्थिती आहे. इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की आता अशाप्रकारे काही घडत असेल आणि जरी घडत असलं तरी मी आज अशा जागेवर जिथे मला शिवीगाळ करण्याची कोणाची हिंमत नाही.” दरम्यान नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल बोलायच तर त्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वध’ या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं होतं.