Nishaanchi box office collection day 1: १९ जुलैला २ मोठे बॉलीवूड चित्रपट रिलीज झाले. एक म्हणजे अनुराग कश्यपचा ‘निशांची’ व दुसरा म्हणजे अक्षय कुमार व अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी 3’. या दोन्ही चित्रपटांपैकी कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर दोन्ही सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे यांनी ‘निशांची’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ऐश्वर्य हा जयदेव ठाकरे व स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. ऐश्वर्यच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार चांगली सुरुवात केलेली नाही. ‘निशांची’ने पहिल्या दिवशी फक्त २५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

दुसरीकडे, अक्षय कुमार व अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी 3’ मात्र दमदार ओपनिंग करण्यात यशस्वी झाला. ‘जॉली एलएलबी 3’ ने १२.५ कोटी रुपयांची कमाई केली. अक्षय व अर्शदच्या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘जॉली एलएलबी 3’ ऐश्वर्यच्या ‘निशांची’ चित्रपटापेक्षा वरचढ ठरला आहे.

‘निशांची’ने ‘जॉली एलएलबी 3’च्या कमाईच्या तुलनेत फक्त २ टक्के कलेक्शन केले आहे. ‘निशांची’ला देशभरात ८०७ शो मिळाले. त्यापैकी १५८ मंबईत आणि १९२ दिल्ली-एनसीआरमध्ये मिळाले. तर ‘जॉली एलएलबी 3’ ला देशभरात ४००० शो मिळाले.

निशांची ट्रेलर-

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन फक्त २५ लाख रुपये असले तरी ते त्याच्या २०२३ मध्ये आलेल्या ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’च्या तुलनेत चांगले आहे. कारण त्याचे एकूण कलेक्शन फक्त २५ लाख रुपये होते. जर ‘निशांची’च्या कमाईत वीकेंडला वाढ झाली नाही तर, तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ आणि अलाया एफच्या ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ नंतर अनुरागचा हा सलग तिसरा फ्लॉप चित्रपट ठरेल.

‘निशांची’ या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे व मोनिका पनवार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटात कुमुद मिश्रा, विनीत कुमार सिंह आणि मोहम्मद झीशान अयुब यांच्याही भूमिका आहेत. ‘निशांची’ हा अनुराग कश्यपचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा बनवायला त्याला ९ वर्षे लागली.