Pakistani actress Bushra Ansari: बॉलीवूडला अँग्री यंग मॅन या संकल्पनेची ओळख करून देणाऱ्या जावेद अख्तर यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. सलीम-जावेद ही जोडी बॉलीवूड चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यासाठी गाजली.
जावेद अख्तर हे त्यांच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास देऊ नये, असे वक्तव्य केले होते. आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीने जावेद अख्तर यांना उद्देशून केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी सध्या परदेश दौऱ्यावर आहे. यावेळचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “आपले लेखक त्यांना तर कारणच पाहिजे होते. त्यांना तर मुंबईत एक घर भाड्यानंदेखील मिळत नव्हतं. माहीत नाही, काय बोलतात. तुम्हाला मरण्यासाठी दोन तास राहिले आहेत आणि त्यात तुम्ही इतक्या फालतू गोष्टी बोलत आहात. इतकी कशाची भीती आहे. इतकी कशाची हाव आहे?
“नसिरुद्धीन शहा कसे शांत राहिले आहेत. तसेच शांत राहा. आणखी काही कलाकारसुद्धा शांत बसले आहेत ना? जे ज्यांच्या मनात आहे, ते तसेच राहू द्यावे. माहीत नाही, काय बोलत आहेत.”
जावेद अख्तर काय म्हणाले होते?
पीटीआयशी संवाद साधताना जावेद अख्तर म्हणाले की, भारतातील दिग्गज कलाकारांना पाकिस्तानने कधीही आमंत्रित केले नाही. पहिला प्रश्न असा आहे की, आपण पाकिस्तानी कलाकारांना इथे परवानगी द्यायची का? याची दोन उत्तरे आहेत आणि दोन्हीही तितकीच तार्किक आहेत. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली व नूरजहाँ भारतात आले होते. आम्ही त्यांचे खूप चांगले स्वागत केले.
लोकप्रिय कवी फैज अहमद फैज पाकिस्तानमध्ये राहत होते. जेव्हा ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत भारतात आले, तेव्हा त्यांना सरकारने मोठ्या आदराने वागवले होते. राज्यप्रमुखांसारखी त्यांना वागणूक दिली होती, असा प्रतिसाद पाकिस्तानकडून कधीच मिळाला नाही.
जर आपण पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली, तर याचा कोणाला आनंद होणार आहे? तर याचा आनंद लष्कर आणि जे कट्टरपंथी आहेत, त्यांना आनंद होणार आहे. त्यांना दोन देशांत असणारे अंतर हवे आहे. भारत व पाकिस्तानमध्ये इतके अंतर यावे की पाकिस्तानमधील नागरिकांना भारतातील नागरिकांचे स्वातंत्र्य व त्यांना मिळणाऱ्या सोई-सुविधा दिसू नयेत, असेच त्यांना वाटते. सध्या पाकिस्तानच्या कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मी नाही म्हणेन, असे म्हणत जावेद अख्तर यांनी भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालावी, असे म्हटले होते.
दरम्यान, आता पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीने केलेल्या वक्तव्यावर जावेद अख्तर उत्तर देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.