दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांचं आज २० एप्रिल रोजी सकाळी निधन झालं. त्यांनी ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पामेला या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती यशराज फिल्म्सने दिली आहे.

हेही वाचा – ज्येष्ठ पार्श्वगायिका व राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचं निधन

यशराचज फिल्म्सने एक स्टेटमेंट इन्स्टाग्रामवर जारी केलं आहे. त्यामध्ये पामेला यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. “जड अंतःकरणाने चोप्रा कुटुंब आपल्याला कळवत आहे की ७४ वर्षीय पामेला चोप्रा यांचं आज सकाळी निधन झालं. आज ११ वाजता मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुमच्या प्रार्थनांसाठी आम्ही आभारी आहोत व या कठीण प्रसंगात गोपनीयतेची विनंती करत आहोत,” असं त्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अनुष्का शर्मा, अजय देवगणसह जावेद अख्तर यांनीही पामेला चोप्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनानंतर चोप्रा कुटुंबाने गोपनीयतेची विनंती केली आहे. “या कठीण काळात माझ्या प्रार्थना आदि, राणी, उदय आणि चोप्रा कुटुंबातील सर्व सदस्यांच्यासोबत आहेत,” असं ट्वीट अजय देवगणने केलं आहे.

तर, जावेद अख्तर यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “यश चोप्रा यांच्या पत्नी पामेलाजी यांचे निधन झाले. त्या अत्यंत हुशार, शिक्षित आणि विनोदी होत्या. माझ्यासारख्या ज्यांनी यशजींसोबत जवळून काम केले आहे, त्यांना त्यांच्या स्क्रिप्ट आणि संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल माहिती आहे,” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पामेला यांनी १९७० मध्ये यश चोप्रा यांच्याशी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. ते अरेंज मॅरेज होतं. त्यांना आदित्य आणि उदय चोप्रा ही दोन मुले आहेत. आदित्य हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याने राणी मुखर्जीशी लग्न केले आहे.