Paresh Rawal Returns To Hera Pheri 3 : काही दिवसांपासून ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटासंबंधित वाद सुरू होता. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहते आनंदी होते. मात्र, परेश रावल यांनी अचानक या चित्रपटातून एक्झिट घेत असल्याची घोषणा केली आणि अनेकांच्या आनंदावर विरजण पडलं. परेश रावल यांच्या एक्झिटच्या बातमीवर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच परेश रावल या चित्रपटात पुन्हा एकदा परत येणार असल्याचे कळले आहे.

त्याबद्दलची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आणि त्यामुळे चाहत्यांनी पुन्हा एकदा आनंद व्यक्त केला आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना स्वतः परेश रावल यांनी ते ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा परतणार असल्याचं सांगितलं. आता होते नव्हते ते सगळे वाद मिटून परेश, अक्षय, सुनील हे त्रिकुट पुन्हा एकदा ‘हेरा फेरी ३’मध्ये दिसणार आहेत.

परेश रावल यांच्या ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा परतण्यामागे काही खास व्यक्तींचा हात आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, निर्माते साजिद नाडियाडवाला आणि अहमद खान यांनी ‘हेरा फेरी ३’चा वाद सोडवला. त्निर्माते फिरोज नाडियाडवाल यांनी सांगितलं, “साजिद नाडियाडवाला आणि अहमद खान या दोघांनी वैयक्तिकरीत्या परेश रावल यांना या चित्रपटात परत आणण्यासाठी प्रयत्न केले.”

‘हेरा फेरी ३’ वाद सोडवण्यात अक्षय कुमारची सुद्धा महत्त्वाची भूमिका

पुढे ते म्हणाले, “या सर्व प्रक्रियेत अक्षय कुमारचीसुद्धा महत्त्वाची भूमिका होती. परेश रावल यांच्याबरोबर असणारे जुने संबंध आणि मैत्रीचं नातं या गोष्टी विचारात घेऊन अक्षयनं अत्यंत शांतपणे हा गुंता सोडवला. माझा भाऊ साजिद नाडियाडवाला आणि अहमद खान यांचं प्रेम आणि योग्य त्या मार्गदर्शनामुळे ‘हेरा फेरी’चं कुटुंब पुन्हा एकत्र आलं आहे.”

पुढे फिरोज नाडियाडवाला म्हणाले, “आमचं नातं ५० वर्षांहून अधिक घट्ट आहे. या चित्रपटाचे जसे आधीचे दोन भाग बनले होते, तशाच सकारात्मकतेनं या ‘हेरा फेरी’चा तिसरा भागसुद्धा बनेल, अशी आशा आहे. आम्ही सर्व जण खूप मेहनत घेत आहोत. ‘हेरा फेरी ३’ चित्रपट २०२५ च्या अखेरीस प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘हेरा फेरी ३’संबंधित वादावर बोलताना परेश रावल यांनी असं म्हटलं, “प्रेक्षक आपल्यावर प्रेम करतात. त्यामुळे त्यांना आपण गृहीत धरता कामा नये. माझं हे म्हणणं आहे की, सगळ्यांनी एकत्र येऊन मेहनत केली पाहिजे आणि एक चांगली कलाकृती निर्माण केली पाहिजे. आमच्यात काही वाद वगैरे नाही. मी, अक्षय, सुनील आणि प्रियदर्शन अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहोत.”