Paresh Rawal Sons: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे मागील काही दिवसांपासून ‘हेरा फेरी ३’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. परेश रावल यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे, त्यामुळे बराच वाद रंगला आहे. निर्माते व परेश रावल या वादावर एकमेकांना कायदेशीररित्या उत्तर देत आहेत. आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या परेश रावल यांचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील. आपली मतं ठामपणे मांडणाऱ्या परेश रावल यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल लोकांना माहीत आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार लोकांना माहीत नाही.

परेश रावल मागच्या ४० वर्षांहून अधिक काळापासून अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत. करिअरमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये फक्त विनोदीच नाही तर विविध धाटणीच्या गंभीर व नकारात्मक भूमिकाही केल्या आहेत. गुजराती असलेल्या परेश रावल यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप संपत आहे. त्या माजी मिस इंडिया आहेत. त्यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. परेश व स्वरूप यांना दोन मुलं आहेत. परेश रावल यांची मुलं काय करतात, त्यांची नाव काय आहेत? हे जाणून घेऊयात.

काय करतात आदित्य व अनिरुद्ध?

परेश रावल व स्वरूप यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं आदित्य व अनिरुद्ध आहेत. आदित्य व अनिरुद्ध दोघेही सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. परेश यांची मुलं अभिनय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांचा मुलगा आदित्य रावल याने २०२० मध्ये ‘बमफाड’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं, तर अनिरुद्ध रावलने ‘सुल्तान’ (२०१७) मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. तसेच त्याने ‘टायगर जिंदा है’ (२०१७) चित्रपट आणि ‘स्कूप’ (२०२३) या सीरिजमध्ये काम केलंय. आपण मुलांना या क्षेत्रात येण्यासाठी मदत केलेली नाही, असं परेश सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
paresh rawal family
परेश रावल यांचे कुटुंब (फोटो – सोशल मीडियावरून साभार)

“माझी मुलं त्यांच्या आवडीनुसार काम करत आहेत. जोपर्यंत ते चुका करत नाहीत तोपर्यंत ते शिकणार नाहीत. त्यांनी मला येऊन विचारलं तरच मी सल्ला देईन. त्यांनी मला विचारलं नाही तर मी त्यांना काहीही सांगत नाही. त्यांना स्वतःचा मार्ग शोधू द्या. त्यांना चुका करू द्या, त्यांना स्वतः शिकू द्या यावर माझा विश्वास आहे. पण मला एक गोष्ट नक्की माहीत आहे, ते खूप मेहनती आणि खूप हुशार आहेत. त्यांनी बॉलीवूडमध्ये येण्यासाठी माझ्या नावाचा वापर केलेला नाही,” असं परेश एका मुलाखतीत मुलांबद्दल म्हणाले होते.