Phir Hera Pheri Fame Actress Left Bollywood : बॉलीवूडमधील अशी लोकप्रिय अभिनेत्री जिने २००३ मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण करीत पहिल्याच चित्रपटातून चित्रपट निर्मात्यांसह प्रेक्षकांच्याही मनावर ताबा मिळवला. त्यानंतरही तिने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर केली. परंतु, अचानक एक दिवस तिने लोकप्रियतेच्या शिखरावर असताना या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

‘हंगामा’, ‘फिर हेरा फेरी’, ‘गोलमाल’ यांसारख्या चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रिमी सेन. रिमी एकेकाळी बॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. परंतु, इतकी लोकप्रियता असतानाही तिने अचानक या क्षेत्रात पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला.

रिमी सेनने २००३ मध्ये ‘हंगामा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेलं. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात परेश रावल, अक्षय खन्ना, नीना कुळकर्णी, संजय नार्वेकर, राजपाल यादव यांसारखे कलाकार झळकलेले. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. त्यानंतर तिने ‘बागबान’, ‘सजनी’, ‘क्यों की’, ‘गरम मसाला’, ‘दीवाने हुए पागल’, ‘धूम’, ‘धूम २’, ‘गोलमाल’, ‘फिर हेरा फेरी’, ‘दे ताली’, ‘संकट सिटी’, ‘थँक्यू’, ‘शागीर्द’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या.

या चित्रपटांमधून तिने अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहिद कपूर, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, परेश रावल, नाना पाटेकर, रितेश देशमुख यांसारख्या अभिनेत्यांबरोबर महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने मॉडेलिंगमध्येही काम केलं. अभिनयासह ती एक निर्मातीसुद्धा आहे. विविध भूमिका साकारत ती घराघरात पोहोचलेली. तिनं २०१५ मध्ये ‘बिग बॉस ९’मध्ये सहभाग घेतला होता.

करिअरदरम्यान तिने अनेक वेगवेगळे निर्णय घेतले. ‘नवभारत टाइम्स’बरोबर संवाद साधताना तिनं सांगितलेलं, “मी माझं करिअर स्वत: उद्ध्वस्त केलं आहे.” त्यासह तिनं तिच्या एका मुलाखतीत तिला त्याच त्याच भूमिकांसाठी विचारणा होते, असंही सांगितलेलं. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार त्यामुळे चित्रपटांतून काम करीत आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या रिमी सेननं या क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला आणि गेली कित्येक वर्षं ती लाइमलाइटपासून लांब आहे.