इंडियन प्रीमियर लीग – आयपीएलच्या २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. आरसीबीने पंजाब किंग्सवर आयपीएलच्या फायनमलध्ये विजय ६ धावांनी साकारला आणि त्यांनी प्रथम विजेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे आरसीबी संघाबरोबरच अनेक वर्षांपासून जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या संघाच्या चाहत्यांनीही विजयाचा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला.
आरसीबीच्या १९१ धावांचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर त्यांचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. त्यामुळे पंजाबच्या हातून हा सामना निसटला आणि अखेर पदरात पराभव पडला. आयपीएल २०२५ चे विजेतेपद हुकल्यामुळे पंजाब किंग्जची सह-मालक आणि अभिनेत्री प्रीती झिंटा निराश झाली होती. तरीही प्रीतीने खेळाडूंकडे जाऊन सांत्वन केलं होतं.
अशातच प्रीतीने तिच्या संघासाठी एक कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “हा प्रवास आम्हाला हवा होता तसा संपला नाही. पण हा प्रवास रोमांचक, मनोरंजक आणि खूपच प्रेरणादायी होता. मला आमच्या तरुण संघाचा संघर्ष आणि जिद्द आवडली. कर्णधार आणि सरपंचाचं आघाडी नेतृत्व, तसंच संघाच्या सर्व सिंहांनी संपूर्ण स्पर्धेत ज्याप्रकारे त्यांचं वर्चस्व दाखवलं ते मला आवडलं.”
यानंतर प्रीती म्हणाली, “हे वर्ष अद्वितीय होतं. आम्ही अनेक विक्रम मोडले. काहींच्या दुखापती आणि राष्ट्रीय कर्तव्यामुळे स्पर्धेत व्यत्यय आले. पण आम्ही प्रत्येक प्रकारे स्वतःला जुळवून घेतले आणि एका दशकानंतर पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेत काही काळ थांबलो. घरचे सामने इतर राज्यांमध्ये हलवले गेले. तरी आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो आणि लढलोदेखील.”
यापुढे प्रितीने म्हटलं, “मला पंजाब किंग्जच्या प्रत्येक खेळाडूचा अभिमान आहे, ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत इतकी चांगली खेळी केली. तसंच आमच्या स्टाफचे आणि पीबीकेएसमधील प्रत्येकाचे खूप खूप आभार. सर्वात महत्त्वाचं, चाहत्यांचेही आभार. जे आमच्या प्रत्येक कठीण काळात आमच्याबरोबर उभे राहिले. अगदी मनापासून आभार. आम्ही जे काही आहोत आणि ज्या स्थितीत इथपर्यंत पोहोचलो, ते सर्व तुमच्यामुळेच आहे.”
यानंतर तिने चाहत्यांना विश्वास देत असं म्हटलं, “मी वचन देते की, आपण विजय साजरा करण्यासाठी पुन्हा परत येऊ. पुढच्या वर्षी पुन्हा स्टेडियममध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. तुम्हा सर्वांना माझे प्रेम’. प्रितीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसंच चाहत्यांनी तिला कमेंट्समध्ये प्रोत्साहनही दिलं आहे.