बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोवर केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
प्रीती झिंटा ही आयपीएलच्या पंजाब किंग्स या संघाची मालकीण आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी व प्रीती झिंटाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो राजस्थानमधील जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममधील आहे. दोघे एकमेकांना मिठी मारत असल्याचा हा फोटो आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रीती झिंटा व १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ‘तो’ फोटो होतोय व्हायरल
सोमवारी राजस्थान रॉयल्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओवरून हा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रीती एका सामन्यानंतर वैभवला भेटताना दिसत आहे. एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. तसेच दोघांनी हस्तांदोलन केल्याचेही पाहायला मिळत आहे.
मात्र, सोशल मीडियालर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये प्रीती वैभवला मिठी मारत असल्याचे दिसत आहे. हे राजस्थान रॉयलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेला हा फोटो एटिड केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक मीडिया चॅनेल्सकडूनही हा फोटो बातम्यांमध्ये दाखवला जात आहे. आता अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रीती झिंटाने सोशल मीडियाने एका न्यूज रिपोर्टचा फोटो शेअर केला आहे; ज्यामध्ये एडिट केलेला फोटो आहे. हा फोटो शेअर करीत अभिनेत्रीने लिहिले, “हा मॉर्फ केलेला फोटो आहे आणि ही बातमी खोटी आहे”. आणखी एका पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले, “मला खूप आश्चर्य वाटत आहे की, आता वृत्तवाहिन्यादेखील मॉर्फ केलेले फोटो वापरत आहेत आणि बातम्या म्हणून ते दाखवत आहेत.”
प्रीती झिंटा ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे. ‘कल हो ना हो’, ‘वीर झारा’, ‘ये रास्ते हैं प्यार के’, ‘दिल चाहता है’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिचे तिच्या भूमिकांसाठी अनेकदा कौतुकही झाले आहे. आता अभिनेत्री सात वर्षांच्या ब्रेकनंतर लवकरच पुनरागमन करणार आहे. याआधी ती २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसली होती.
आता लवकरच ती लाहोर १९४७ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट राजकुमार संतोषी दिग्दर्शित करणार आहेत. आमिर खान व सनी देओल या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. त्याबरोबरच शबाना आझमी, अली फझल हे कलाकारदेखील त्यात महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.