२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून २६ निष्पाप लोकांची हत्या झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्यांबद्दल संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यासाठी जो जबाबदार असेल त्याला जगाच्या कोपऱ्यातून शोधून काढू असं सांगत भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच दशहतवाद्यांच्या या क्रूर प्रवृत्तीला विरोध दर्शवत अनेक कलाकार महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत. या हल्ल्यानंतर अनेक हिंदी, दाक्षिणात्य तसेच मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत दु:ख व निषेध व्यक्त केला. अशातच आता रजनीकांत यांनीही या हल्ल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या दुर्घटनेबद्दल रजनीकांत यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकटाला प्रभावीपणे लढा देण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचेही सांगितले. या कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे उत्तम नेतृत्व करतील. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणतील आणि त्या प्रदेशाचं नवं वैभवदेखील पुन्हा आणतील असा आशावाद रजनीकांत यांनी व्यक्त केला. रजनीकांत आज (१ मे) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्हज २०२५ (WAVES 2025) मध्ये सहभागी झाले होते.

यावेळी पहलगाम हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे एक उत्तम नेतृत्व आहेत, जे जम्मू आणि काश्मीरमध्ये नक्कीच शांतता आणतील. पंतप्रधान मोदी एक लढाऊ व्यक्ती आहेत. ते कोणत्याही आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जातात आणि त्यांनी ते सिद्ध केले आहे, जे आपण गेल्या दशकापासून पाहत आहोत. नरेंद्र मोदीजी काश्मीरमध्ये शांतता आणतील. शिवाय आपल्या देशाला अभिमान वाटेल अशी कृती नक्कीच करतील.”

यापुढे ते म्हणाले की, “पहलगाम हल्ल्यानंतर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट कार्यक्रम रद्द केला जाईल असं मला काहीजण म्हणाले होते. पण मला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वासामुळेच हा कार्यक्रम पार पडला. मला येथे येऊन खूप आनंद झाला आहे आणि या वेव्हज कार्यक्रमाचा भाग असणे माझ्यासाठी भाग्य आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो.”

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हा भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याचा एक उपक्रम आहे. चित्रपट, ओटीटी, गेमिंग, डिजिटल मीडिया, एआय, कॉमिक्स, ब्रॉडकास्टिंग आणि एक्सटेंडेड रिअ‍ॅलिटी यासारख्या अनेक क्षेत्रांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून भारताचे सर्जनशील कौशल्य आणखी सुदृढ होईल. या समिटमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांसारख्या मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा सहभाग आहे.