Rajkummar Rao Bhool Chuk Maaf OTT release : २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील हल्ल्यानंतर, भारताने काल (७ एप्रिल) पाकिस्तानामधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केलं आणि त्यांना हा हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं. भारताने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीयांच्या सुरक्षिततेचा विचार करून सरकारने सुरक्षिततेसाठी काही पाऊले उचलली आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर संरक्षणासाठी नागरिकांना मॉक ड्रिलचं प्रशिक्षण दिलं जात आहे.
देशातील सध्याची परिस्थिती पाहता बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने त्याच्या चित्रपटासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे अभिनेत्याने त्याच्या ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचं ओटीटीवर प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी ॲडव्हान्स बुकिंग केली होती. मात्र, देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करून हा चित्रपट आता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘भूल चुक माफ’च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत माहिती शेअर केली. त्याचबरोबर त्यांनी एक निवेदनही जारी केले. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “देशात सध्या घडणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी आणि देशातील मॉक ड्रिल्सचे प्रशिक्षण लक्षात घेता ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट १६ मे रोजी प्राइम व्हिडीओवर वर्ल्डवाइड प्रीमियर करण्यात येईल. आम्हाला चित्रपटगृहांत प्रेक्षकांबरोबर हा अनुभव शेअर करायची अपेक्षा होती, पण राष्ट्र प्रथम ही भावना सर्वोच्च आहे.”
‘भूल चूक माफ’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी व्यतिरिक्त सीमा पाहवा संजय मिश्रा, झाकीर हुसेन, सीमा भार्गव पाहवा, रघुबीर यादव, इश्तियाक खान, अनुभा फतेह पुरिया, जय ठक्कर आणि प्रगती मिश्रा आदी कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली होती.
‘भूल चूक माफ’ चित्रपटाच्या ओटीटीवरील घोषणेनंतर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी अनेकांनी निर्मात्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. याबद्दलच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत. याबद्दल वामिका गब्बीने अमर उजालाशी केलेल्या विशेष असं म्हटलं की, “देशातील परिस्थिती पाहता, चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नव्हते. आम्ही आमच्या कायम देशाबरोबर आहोत.”
यापुढे वामिका म्हणाली, “चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या निर्मात्यांच्या निर्णयाचा मला आनंद आहे. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हे आपल्या सर्वांसाठी खास होते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता, आता हा चित्रपट ओटीटीमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल याचा आम्हाला आनंद आहे. चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असला तरी यामार्फत तो अधिक लोकांपर्यंत पोहोचेल असा माझा विश्वास आहे.”