दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरातून मिळत असलेला प्रतिसाद पाहून सध्या दाक्षिणेतील तामिळ, तेलुगू, मल्याळी यांसारख्या भाषेतील चित्रपटांचे चांगले दिवस सुरू असल्याचं दिसतं. त्यामुळे हल्ली हिंदीतील अनेक चित्रपटांमध्येही दाक्षिणात्य कलाकार झळकताना दिसतात, तर मोठ्या प्रमाणात दाक्षिणात्य चित्रपटांना हिंदी भाषेत डबही केलं जातं. परंतु, सध्या जरी हिंदीतील चित्रपटांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागत असला आणि हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तुलना होत तरी एक काळ असाही होता, जेव्हा दाक्षिणात्य चित्रपट चालायचे नाही. तेथील चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसे, त्यामुळे अनेकदा तेथील निर्माते मंडळी इतर भाषेत गाजलेल्या चित्रपटांचा रिमेक बनवायचे.

बॉलीवूडमधील चित्रपटांची आता जी परिस्थिती आहे तशीच पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांचीसुद्धा होती. अशातच प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी सुपस्टार रजनीकांत, चिरंजीवी यांसारखे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचा रिमेक असलेल्या चित्रपटात काम करून प्रसिद्ध झाले असल्याचं म्हटलं आहे. ‘इंडिया टीव्ही शोबिझ’शी संवाद साधताना ते म्हणाले, ” ७०-८० च्या काळात दक्षिणमधील चारही भाषेतील चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे रिमेक बनवले जायचे. रजनीकांत, चिरंजीवी, नंदमुरी तारका रामा राव यांनी अमिताभ बच्चनच्या अनेक चित्रपटांचे रिमेक बनवले.”

“अमिताभने पाच वर्षांचा मोठा ब्रेक घेतला आणि त्याचवेळी म्युझिक कंपन्या त्यांची गाणी विकण्यासाठी चित्रपट बनवायला लागल्या. तेव्हाच ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट आला होता, पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने मात्र अमिताभच्या चित्रपटांचा रिमेक बनवणं काही थांबवलं नाही आणि त्यामुळेच खरंतर हे सगळे प्रसिद्धीझोतात आले.” राम गोपाल वर्मा यांनी असंही म्हटलं होतं, पूर्वी अनेक तरुण दिग्दर्शक शहरी भागांमध्ये लहानाचे मोठे झाल्याने विदेशी चित्रपटांना अधिक महत्त्व देत होते. पुढे ते म्हणाले, “तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर दाक्षिणेतील व्यावसायिक चित्रपटांचे दिग्दर्शक सिनेमावर फार बोलू शकत नाहीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राम गोपाल वर्मा हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक आहेत. त्यांनी आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. हिंदीसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे. ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’, सरकार’ यांसारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे; तर ‘सिंडिकेट’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव असून जानेवारी २०२५ ला त्यांनी एक्सवर या चित्रपटाची घोषणा केली होती.