आलिया भट्टचा १५ मार्चला वाढदिवस आहे. आलिया आता ३२ वर्षांची होणार आहे. त्यामुळे १३ मार्चला रणबीर कपूर व आलिया भट्टने मुंबईत पापाराझींबरोबर प्री-बर्थडे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर दोघं अलिबागला रवाना झाले. रणबीर व आलिया एकत्र बर्थडे सेलिब्रेट करणार होते. पण आज, १४ मार्चला रणबीरचा खास मित्र, दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी यांचं निधन झालं. ही दुःखद बातमी समजातच रणबीर आलियाचं बर्थडे सेलिब्रेशन सोडून अलिबागहून मुंबईत परतला.
मुंबईत येताच रणबीर कपूर व आलिया भट्टने सर्वात आधी अयान मुखर्जीचं घर गाठलं. दोघं अयानला भेटले. यावेळी देब मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना रणबीर भेटताना दिसला. करण जौहर, जया बच्चन, श्वेता बच्चन, सलीम खान असे अनेक सेलिब्रिटी देब मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते.
माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देब मुखर्जी आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज १४ मार्चला मुंबईतल्या राहत्या घरी देब यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर संध्याकाळी देब मुखर्जी यांच्यावर विर्लपार्लेच्या पवन हंस स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रणबीर कपूर देब मुखर्जी यांच्या पार्थिवाला खांदा देताना दिसला.
दरम्यान, देब मुखर्जी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ६० आणि ७०च्या दशकात देब मुखर्जी यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं होतं. १९८३मध्ये ‘कराटे’, १९७९मध्ये ‘बातों बातों में’, १९७८मध्ये ‘मै तुलसी तेरे आंगन की’, १९९२मध्ये ‘जो जीता वही सिकंदर’ अशा बऱ्याच चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण, देब मुखर्जी यांना अभिनय क्षेत्रात हवं तसं यश मिळालं नाही.
देब मुखर्जी यांचं आशुतोष गोवारिकर अन् काजोलबरोबर आहे खास नातं
देब मुखर्जी यांचं आशुतोष गोवारिकर आणि काजोलबरोबर खास नातं होतं. आशुतोष गोवारिकरांचे देब मुखर्जी सासरे होते. सुनीता गोवारिकर या देब यांची मुलगी आहे. तसंच देब यांचा भाऊ शोमू मुखर्जीचं लग्न अभिनेत्री तनुजा यांच्याबरोबर झालं होतं. त्यामुळेच तनुजा यांची मुलगी काजोलचे देब यांच्याबरोबर खूप चांगले संबंध आहेत. काजोल आणि देब मुखर्जी अनेक कार्यक्रमात एकत्र दिसायचे. दोघांच्या व्हिडीओची नेहमी चर्चा रंगायची.