Rekha recalled Amitabh Bachchan’s bizarre advice: रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल, त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल, त्यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांबद्दल आजही अनेकदा बोललं जातं. त्यांच्या आठवणी, किस्से सांगितले जातात.

सुपरस्टार जेमिनी गणेशन हे रेखा यांचे वडील होते. त्यांनी कधीही रेखा यांच्या आईला मुलांना वाढवण्यात, त्यांचे संगोपन करण्यात मदत केली नाही, त्यामुळे रेखा यांना नववीतून शाळा सोडावी लागली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअरला सुरुवात केली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. मात्र, तिथे त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. याचे कारण म्हणजे जेमिनी गणेशन यांच्या अनौरस मुलीला चित्रपटात कास्ट करण्यास लोक कचरत होते. त्यानंतर रेखा मुंबईला आल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. कुलजीत आणि शत्रुजीत पाल बंधूंनी त्यांना आठ चित्रपटांत काम दिले.

“मी एकाचवेळी जवळजवळ ४०…”

विशेष म्हणजे त्यादरम्यान त्यांना हिंदी समजत नव्हते. फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा म्हणालेल्या, “मला हिंदी समजायचे नाही. जेव्हा लोक माझ्याशी चांगले वागायचे किंवा वाईट वागायचे तेव्हा मी त्यांना सांगू शकत नव्हते. मला असे वाटायचे की परत जावे आणि माझ्या बाहुल्यांशी खेळत बसावे. पण, मी घरातील कमावती व्यक्ती होते. मला माझ्या वयाआधीच मोठे व्हावे लागले. माझ्या भावंडांची काळजी घ्यावी लागली.”

रेखा यांचा ‘दो शिकारी’ हा पहिला चित्रपट होता. मात्र, त्यांचा ‘सावन भादों’ हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांचे सलग आठ-दहा चित्रपट प्रदर्शित झाले. एका जुन्या मुलाखतीत रेखा म्हणालेल्या, “७० च्या दशकाच्या शेवटी आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीला मी तीन शिफ्टमध्ये अन्नपूर्णा स्टु़डिओमध्ये काम करत होते. मी एकाचवेळी जवळजवळ ४० चित्रपटांत काम करत होते.”

रेखा यांनी बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. त्यांनी ‘धर्मात्मा’, ‘घर’, ‘मुक्कदर का सिंकदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सिलसिला’, ‘नमक हराम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे हे चित्रपट खूप गाजले.

या चित्रपटांत त्यांच्याबरोबर जे सहकलाकार असत, त्यांच्याकडून रेखा अनेक गोष्टी शिकल्या. एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल रेखा म्हणालेल्या, “आज मी ज्या पद्धतीची कलाकार आहे, त्याचे १०० टक्के श्रेय मी अमिताभ बच्चन यांना देते. त्यांनी जे जे मला दिले, शिकवले ते मी शिकले. त्यांचे निरीक्षण करून मी अनेक गोष्टी आत्मसात केल्या.”

“जेव्हा सीनचे शूटिंग सुरू…”

‘सिलसिला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना कसे प्रोत्साहन दिले होते, याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. रेखा म्हणालेल्या, “सिलसिला चित्रपटात असा एक सीन होता, जो १५ हजार लोकांच्या गर्दीत सकाळी ५ वाजता करायचा होता. माझे डायलॉग खूप मोठे होते. मी रडण्याच्या स्थितीत होते. मी यश चोप्रा यांना वेळ मागितला, पण त्यांनी नकार दिला.”

“त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणालेले की, दिग्गज अभिनेते जेम्स डिन यांनादेखील अशीच गर्दीमध्ये सीन करण्याची भीती वाटत होती. त्यांनी एक गोष्टी केली, ती म्हणजे ते गर्दीकडे वळले आणि त्यांनी गर्दीसमोर लघुशंका केली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. जेम्स डीन यांनी विचार केला की यापेक्षा वाईट काय होऊ शकते, त्यानंतर त्यांनी सुंदर सीनचे शूटिंग केले.

पुढे रेखा म्हणालेल्या, “जेव्हा सीनचे शूटिंग सुरू झाले. त्यावेळी सगळेजण शांत झाले. सीनच्या शेवटी मी अमितजींना मिठी मारली, तेव्हा सर्वांनी ओरडून प्रतिसाद दिला. मी माझ्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला.” रेखा व अमिताभ बच्चन यांनी १० चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

याबरोबरच, रेखा यांनी जितेंद्र यांच्याबरोबर ३० हून अधिक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. सातत्याने त्यांची जोडी स्क्रीनवर दिसत असल्याने ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाऊ लागले. पण, या दोन्ही कलाकारांनी याबद्दल कधीही वक्तव्य केले नाही. पण, आजही त्यांची मैत्री तशीच असल्याचे दिसते.