Rekha Spoke About Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन व रेखा ही बॉलीवूडमधील दोन दिग्गज नावं आहेत. अनेकदा या दोघांबद्दल चर्चा केली जाते, याचं कारण म्हणजे अमिताभ बच्चन व रेखा यांचं एकेकाळी अफेअर होतं. त्यांची प्रेम कहाणी खूप गाजली होती. आजसुद्धा या दोघांच्या नात्याबद्दल अनेकदा बोललं जातं. या दोघांची जवळीक ‘दो अनजाने’ या चित्रपटाच्या सेटवर वाढली होती, तर त्यांनी ‘सिलसिला’ या चित्रपटातून शेवटचं एकत्र काम केलं होतं.
‘सिलसिला’नंतर जरी या जोडीने एकत्र काम केलं नसलं तरी अनेकदा या जोडीबद्दल, त्यांच्या गाण्यांबद्दल आणि चित्रपटांबद्दल चर्चा होत असते. आजही या दोघांबद्दल अनेकदा बोललं जातं; तर स्वत: रेखा यांनीसुद्धा एका मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगितलं होतं. रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांच्या मनात घर केलं, त्यामुळे अनेकदा त्यांचं कामासाठी प्रेक्षकांकडून कौतुक होतं असतं. या मुलाखतीमध्ये मात्र त्यांनी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या खास कॉम्प्लिमेंटबद्दल सांगितलं आहे.
रेखा यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. यानिमित्ताने त्यांनी ‘रेडिफ’सह संवाद साधला होता, तेव्हा त्यांनी एका सहकलाकाराबरोबर अनेक वर्षे काम केल्यानंतर त्याचा तुमच्या कामावर, जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत सांगितलं होतं. यावेळी त्या अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत म्हणाल्या होत्या, “जेव्हा आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा आमचं एकमेकांबद्दल खूप चांगलं मत निर्माण झालं होतं; आम्ही दोघे एकमेकांच्या स्वभावाने प्रभावीत झालो होतो.”
रेखा यांनी यावेळी अमिताभ बच्चनकडून त्यांना मिळालेल्या खास कॉम्प्लिमेंटबद्दलही सांगितलेलं. त्या म्हणाल्या, “अमितजी यांनी कळत नकळत मला दिलेली कॉम्प्लिमेंट म्हणजे त्यांनी मला त्यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासह काम करण्याची संधी दिली. माझ्यासाठी ही मला मिळालेली सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट आहे.”
रेखा, अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी ‘सिलसिला’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. असं म्हटलं जातं की, सुरुवातीला जया बच्चन या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हत्या, परंतु नंतर त्यांनी चित्रपटात एकत्र काम करण्यास होकार दिला आणि रेखा व अमिताभ बच्चन यांनीसुद्धा शेवटचं या चित्रपटातून एकत्र काम केलं होतं. यश चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
दरम्यान, रेखा व अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आजवर ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’, ‘दो अंजाने’, ‘राम बलराम’, ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांतून एकत्र काम केलं होतं.