Renuka Shahane : आपल्या सहज-सुंदर अभिनयाने व निखळ हास्याने अभिनेत्री रेणुका शहाणेंनी सर्वांनाच भुरळ पाडली आहे. ९० च्या दशकातील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेणुका शहाणे ‘देवमाणूस’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यामध्ये त्यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह स्क्रीन शेअर केली आहे.

रेणुका यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, सलमान खान अशा अनेक कलाकारांबरोबर त्या झळकल्या आहेत. यापैकी माधुरी दीक्षित केवळ त्यांची सहकलाकार नसून गेली अनेक वर्षे या दोघींमध्ये घट्ट मैत्री आहे. रेणुका आणि माधुरी यांनी ‘हम आपके है कौन’मध्ये सख्ख्या बहिणींची भूमिका साकारली होती. प्रत्यक्षात आजही या दोघींचं नातं अगदी बहिणींसारखं आहे.

कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे माधुरीबद्दल म्हणाल्या, “माझी परमप्रिय माधुरी…तिच्याबद्दल काय बोलू, ती खूप जास्त गोड आहे. तिचा स्वभाव प्रचंड गोड आणि ती नेहमी सर्वांशी नम्रपणे बोलते, आदराने वागते. आपल्याला सिनेविश्वात अजून चांगलं काम कसं करता येईल याचा विचार माधुरी सतत करत असते. खरं सांगायचं झालं, तर दोन बहिणींमध्ये कसं नातं असतं, अगदी तसंच नातं आम्हा दोघींचं नातं आहे. आजही आम्ही भेटतो तेव्हा बहिणींप्रमाणे गप्पा मारतो.”

याशिवाय यापूर्वी ‘सोनी मराठी’वरील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर रेणुका शहाणेंनी माधुरीच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “हम आपके है कौन’ सेटवर मला माधुरीने फार सांभाळून घेतलं होतं. त्यावेळी आऊटडोअर शूटिंगला सेटवर स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने आम्ही मुली दिवसभर पाणीच प्यायचो नाही. ‘जर दिवसभर पाणी नाही प्यायलीस तर तुझ्या स्किनची कशी वाट लागेल याचं उदाहरण तुझ्यासमोर आहे’ असं माधुरीने मला तिच्या चेहऱ्याकडे हात करून सांगितलं. कारण, माधुरीला स्किनचा प्रचंड त्रास व्हायचा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या होत्या, “माधुरी मला कायम सेटवर स्वत:च्या बाजूला बसवायची. सगळ्या लोकांबरोबर ओळख करून द्यायची. मला सेटवर कायम ‘शहाणी’ म्हणून ती हाक मारायची. तिचे कायम ‘शहाणी इकडे ये…शहाणी’ असं सुरु असायचं. तिच्यामुळे मला ‘हम आपके है कौन’ सेटवर फार छान वाटायचं आणि माधुरीने माझी प्रचंड काळजी घेतली.”