Saif Ali Khan Pataudi Palace Inside Photos : मन्सूर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या तीन मुलांची नावं सबा, सोहा आणि सैफ अली खान अशी आहेत. वडिलांच्या निधनानंतर सैफला पतौडी पॅलेसचा वारसा हक्क मिळाला. या पॅलेसला ‘इब्राहिम कोठी’ म्हणूनही ओळखलं जातं. सैफचे आजोबा नवाब इफ्तिखार अली खान यांनी हा पॅलेस बांधला होता.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हरियाणात १० एकर जागेवर पसरलेल्या या पॅलेसची किंमत सध्या जवळपास ८०० कोटी आहे. या पॅलेसचं बांधकाम १९३५ मध्ये आर्किटेक्ट रॉबर्ट टॉर रसेल यांनी पूर्ण केलं होतं. २००५-२०१४ या काळात हा पॅलेस नीमराणा हॉटेल्स समूहाला भाड्याने देण्यात आला होता. पण, त्यानंतर सैफने करार पूर्ण करून हा पॅलेस स्वत:च्या ताब्यात घेतला. कुटुंबीय आता हे घर स्वत:साठी वापरतात. याशिवाय चित्रपटांच्या शूटिंगसाठी भाड्याने देखील देतात.

सैफच्या आलिशान राजवाड्यात १५० खोल्या आहेत. ‘इंडिया टुडे’शी काही वर्षांपूर्वी संवाद साधताना सैफ म्हणाला होता, त्याच्या आजीने त्याला सांगितलं होतं की, या राजवाड्याचं कधीही हॉटेलमध्ये रूपांतर करू नका. कारण या पॅलेसचं ऐतिहासिक महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, अभिनेत्याच्या वडिलांना असं वाटलं की, जर काळाबरोबर पुढे जायचं असेल, तर या पर्यायाचा विचार करावा लागेल.

House of Pataudi
पतौडी पॅलेस (Photo: House of Pataudi/YouTube)

सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल सांगायचं झालं, तर हा पॅलेस कोणत्याही शाही राजवाड्यापेक्षा कमी नाहीये. यामध्ये जवळपास १५० खोल्या आहेत. ज्यामध्ये ७ बेडरूम, ७ ड्रेसिंग रूम, रॉयल डायनिंग रूम, बिलियर्ड रूम यांचा समावेश आहे. या पॅलेसमध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

House of Pataudi
फोटो – सोहा अली खान इन्स्टाग्राम
House of Pataudi
फोटो – करीना कपूर खान इन्स्टाग्राम

सैफ अली खान व त्याचे कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एकत्र पतौडी पॅलेसमध्ये जातात. सध्या सैफ करीना व मुलांसह मुंबईत राहत आहेत. अनेक बॉलीवूड चित्रपटांचं शूटिंग देखील सैफच्या पतौडी पॅलेसमध्ये झालं आहे. ‘वीर-झारा’, ‘मंगल पांडे’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘गांधी’, ‘तांडव’, ‘अ‍ॅनिमल’ यांसारख्या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे.