अभिनेता सलमान खान हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. आजवर त्यानं अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सलमानची आज जितकी लोकप्रियता आहे, तितकीच ९० च्या काळातसुद्धा होती. आजसारखाच त्याचा त्याकाळीसुद्धा मोठा चाहतावर्ग होता. त्याचे अनेक चित्रपट आणि त्यातील गाण्यांना चाहत्यांनी कायमच भरभरून प्रतिसाद दिला आहे. सलमानची अनेक गाजलेली गाणी आजही चाहत्यांच्या आठवणीत आहेत.
सलमानची ‘तुमसे मिलना,’ ‘चांद छुपा बादल में,’ ‘क्यों की इतना प्यार,’ ‘हर दिल जो प्यार करेगा,’ ‘जिने के हैं चार दिन,’ ‘ओ ओ जाने जाना,’ यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी आहेत. या सर्व गाण्यांमध्ये त्याच्याबरोबर त्याकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री झळकल्या होत्या. पण, सलमान खानचं असंही एक गाणं आहे, ज्याची क्रेझ आजही कमी झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये त्याच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर झळकली होती.
हे गाणं आहे ‘जब प्यार किसीसे होता है’ या चित्रपटातील. या चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री ट्विंकल खन्ना झळकली होती. परंतु, या चित्रपटात एक असं गाणं आहे, ज्यामध्ये ट्विंकल नाही तर नम्रता शिरोडकर सलमानबरोबर पाहायला मिळाली. ‘ओ जाना ना जाना’ या गाण्यात हे दोघे झळकले होते. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली; पण सलमान-नम्रताच्या या गाण्यानं अनेकांना वेड लावलं होतं.
‘ओ जाना ना जाना’ या गाण्याला आता २७ वर्ष झाली आहेत आणि तरीसुद्धा आजही हे गाणं अनेकजण तितक्याच आवडीने ऐकत असतात. तर हा चित्रपट त्याकाळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे.
दरम्यान, नम्रता शिरोडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘पूरब की लैला पच्छीम की छैला’, या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिच्यासह अभिनेता अक्षय कुमार व सुनील शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर यासह तिने ‘मसीहा,’ ‘दिल विल प्यार व्यार,’ ‘अलबेला,’ ‘आघाज,’ ‘वामसी,’ ‘अस्तित्व,’ ‘वास्तव,’ ‘पुकार’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.