Salman Khan’s Bodyguard Shera’s Father Passed Away : सलमान खानचा अंगरक्षक शेराच्या वडिलांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. शेराच्या वडिलांचं आज (७ ऑगस्ट) गुरुवारी निधन झालं. शेराच्या वडिलांचं नाव सुंदर सिंग जॉली असं होतं. शेराने याबाबत स्वत: माहिती दिली.

‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार शेराने याबाबत अधिकृत स्टेटमेंट दिलं आहे. तो म्हणाला, “माझे वडील सुंदर सिंग जॉली यांचं निधन झालं आहे. आमच्या राहत्या घरी १९०२, पार्क लक्जरी रेसीडेंस, लोखंडवाला बॅक रोड, ओशिवरा, अंधेरी वेस्ट, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.” आता शेराच्या वडिलांचं पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आलं आलं आहे.

सलमान शेराच्या वडिलांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. काही महिन्यांपूर्वीच शेराने त्याच्या वडिलांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ती पोस्ट शेअर केलेली. त्याने लिहिलेलं की, “८८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझ्यासाठी देवासमान आहात. माझा आदर्श आहात. तुमच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते. लव्ह यू डॅड.” यावेळी त्याने त्याच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो शेअर केले होते. शेराच्या वडिलांना कर्करोग झाला होता व त्यांच्यावर त्यासाठी उपचार सुरू होते.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याचे खरे नाव गुर्मित सिंग जॉली असे असून तो गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून त्याचं काम पाहत आहे. यासह त्याची स्वत:ची टायगर सिक्युरिटी नावाची कंपनी आहे, जी बॉलीवूडमधील काही लोकप्रिय कलाकारांच्या सुरक्षेचं काम बघते. करीना कपूर, कतरिना कैफ व ह्रतिक रोशन यांसारख्या कलाकारांच्या सुरक्षेचं काम ही कंपनी बघते.

शेराने एका मुलाखतीमध्ये सलमान खानबद्दल सांगितलेलं. तो म्हणालेला, “सलमान खानच्या जिवाला धोका आहे, त्यामुळे जेव्हा असं काही असतं तेव्हा तुम्ही अंगरक्षक म्हणून योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. सलमानच्या बाबतीत नेहमी एकच आव्हान असतं ते म्हणजे गर्दी. आम्ही सलमान भाईची काळजी घेतो आणि बाकीचे अंगरक्षक गर्दी असते त्याकडे बघतात.”