Salman khan on Aamir Khan: बॉलीवूडच्या काही कलाकारांची नेहमीच चर्चा होताना दिसते. कधी त्याचे प्रदर्शित होणारे चित्रपट, कधी सार्वजनिक ठिकाणी लावलेली हजेरी, तर अनेकदा त्यांची वक्तव्ये लक्ष वेधून घेताना दिसतात.

आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे काम करीत उत्तम चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाबरोबर त्यांच्यातील ऑफस्क्रीन बॉण्डिंगदेखील प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. या तिन्ही कलाकारांना एकत्र पाहणे प्रेक्षकांना पर्वणी असते.

“आमिर ७ वाजता…”

आता आमिर खान व सलमान खान यांनी एकत्रित काजोल व ट्विंकल खन्ना यांच्या टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव, त्यांच्या करिअरमधील किस्से, तसेच खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या. आता सलमानचे एक वक्तव्य मात्र लक्ष वेधून घेत आहे.

काजोलने सलमान व आमिरला विचारले की, ती तुमची मैत्री खूप चांगली कधी झाली? त्यावर सलमान म्हणाला, “आमच्या पहिल्यापासूनच चांगली मैत्री होती. आम्ही अंदाज अपना अपना या चित्रपटात एकत्र काम केले. आमिर ७ वाजता सेटवर यायचा. त्यावर आमिर म्हणाला की, सेटवर येण्याची जी वेळ असायची, त्याच वेळेला मी यायचो. त्यावर सलमान खान म्हणाला, “९ ची शिफ्ट असायची. आमिर त्यावेळी एकच चित्रपट करीत होता. मी १५ चित्रपटांत काम करीत होतो.”

सलमान पुढे म्हणाला, “त्यावेळी मी ७-२, २-१० व १०-५ च्या शिफ्टमध्ये काम करायचो. मी जेव्हा सेटवर यायचो, तोपर्यंत मी थकलेला असायचो. तर हा सीनचा सराव करीत असायचा. एका-एका सीनसाठी तो खूप वेळा सराव करायचा. मग मी कंटाळून म्हणायचो की, जेव्हा याचा सराव करून होईल तेव्हा मला बोलवा. त्यावेळी त्याला वाटायचे की, मला काम करण्यात कोणताही रस नाही. पण, जर व्यक्ती तीन शिफ्टमध्ये काम करीत असेल, तर कंटाळून जातो आणि त्याला रस वाटत नाही”, असे म्हणत अति काम केल्यामुळे आमिरसारखा सतत सीनचा सराव करणे अशक्य होते, असे सलमान म्हणाला.

आमिरच्या कामाबद्दल बोलायचे, तर आमिर काही दिवसांपूर्वी सितारे जमीर पर या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाची त्याने निर्मितीदेखील केली आहे. तर सलमान खान सध्या बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याबरोबरच, सध्या तो बिग बॉसच्या १९ व्या सीझनचे सूत्रसंचालन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.