‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यप हा अनुराग कश्यपचा भाऊ आहे. अभिनव मागील काही दिवसांपासून सलमान खान व त्याच्या कुटुंबियांवर टीका करताना दिसतोय. याचदरम्यान, सलमान खानने अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ चित्रपटासाठी पोस्ट केली आणि पाठिंबा दिला. सलमानने १३ सप्टेंबरला केलेल्या या पोस्टमध्ये अनुरागला टॅग केलं. यानंतर आता अभिनवने प्रतिक्रिया दिली. सलमान खान तळवे चाटणार असं अभिनवने म्हटलंय.
बॉलीवूड ठिकाना पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनव म्हणाला, “सलमानच्या नशिबात लिहिलंय की आता तो आमचे तळवे चाटेल. मी एक मुलाखत दिली. मी त्याला गुंड म्हटलं, त्यामुळे आता तो आमचा चाहता असल्याचं दाखवतोय. तोच सलमान ज्याने अनुराग कश्यपला तेरे नाममध्ये त्रास दिला होता. अनुरागने तो चित्रपट सोडला. सलमानने त्याला काढलं नव्हतं. आता तोच सलमान अनुरागचं कौतुक करताना दिसतोय. आता करेल तो त्याचे कौतुक करेल, पण आता त्याच्यासमोर गुडघे टेकेल. इतकंच नाही तर सलमान खान अनुरागसमोर भीकही मागेल.”
सलमानने अनुराग कश्यपच्या चित्रपटाचं कौतुक केलं कारण…
अभिनवने सलमानवर लाच देण्याचा आरोपही केला. अभिनव म्हणाला, “मला व्हॉट्सअॅपवर एक जाहिरात आली. बुर्ज खलिफाच्या ५० व्या मजल्यावर एक फ्लॅट आहे आणि त्याच्या वर एक क्लबहाऊस आहे. किंमतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. खरं तर, तो मला गप्प करण्यासाठी लोक शोधत आहेत. त्याने अनुरागच्या चित्रपटाचे कौतुकही केले, कारण तो माझा भाऊ आहे. त्याला वाटत असेल की तो मला समजावून सांगेल. म्हणूनच तो चापलूसी करतोय. म्हणून तो कौतुक करतोय.”
अभिनव कश्यपच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो २००४ साली आलेल्या ‘युवा’ चित्रपटासाठी मणिरत्नम यांचा सहाय्यक दिग्दर्शक होता. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘दबंग’चं दिग्दर्शन अभिनवने केलं होतं. दबंग प्रदर्शित होऊन १५ वर्षे झाली, त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत अभिनवने सलमान खान दिखावा करतो, तो गुंड आहे, तो संकुचित मानसिकतेचा आहे, अशी विधानं केली. सध्या अभिनव सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.