Shah Rukh Khan Was The First Choice For Nayak : अनिल कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे त्यांनी ‘नायक’ चित्रपटात साकारलेली शिवाजीराव ही भूमिका. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, ‘नायक’साठी अनिल कपूर नाही तर शाहरुख खानला पहिली पसंती होती.
एस. शंकर दिग्दर्शित २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायक’ चित्रपटात अनिल कपूर यांनी मुख्य नायकाची भूमिका साकारलेली. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री राणी मुखर्जी झळकली होती. परंतु, अनिल कपूर यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून त्यांच्या आधी शाहरुख खानला हा चित्रपट ऑफर झालेला याबद्दल सांगितलं होतं.
अनिल कपूर यांची पोस्ट
आज ७ सप्टेंबर रोजी ‘नायक’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे, ज्याला त्यांनी खास कॅप्शनही दिली आहे. यामधून ते म्हणाले, “काही भूमिका तुमची ओळख बनतात. नायक ही त्यापैकीच एक. सुरुवातीला ही भूमिका शाहरुख खान व आमिर खानला ऑफर झालेली, पण मला माहीत होतं की ही व्यक्तिरेखा मला जगायची आहे आणि मी शंकर सरांचा यासाठी आभारी आहे की, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.”
पुढे ते म्हणाले, “मी आजही शाहरुख खानच्या स्टेजवरील त्या शब्दांना विसरलो नाहीये, तो म्हणालेला, ही भूमिका अनिलसाठीच होती; अशा क्षणांची आठवण आयुष्यभर सोबत राहते.”
‘नायक’साठी अनिल कपूर यांच्या आधी शाहरुख खान व आमिर खानला झालेली विचारणा
‘नायक’ चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी २००१ साली ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलेलं. त्यांनी सांगितलेलं की, ते यासाठी आमिर खानला भेटले होते. त्यांनी कथानकही ऐकवलं, परंतु त्यांची मतं एकमेकांपेक्षा वेगळी असल्याचं त्यांना जणवलं. ते म्हणाले, “त्याची मतं माझ्या मतांपेक्षा वेगळी होती, त्यामुळे मी तिथून निघालो.”
दिग्दर्शक पुढे शाहरुख खानबद्दल म्हणालेले, “शाहरुख आमिरपेक्षा अधिक आदाराने वागला. त्यावेळी त्याने नुकतच त्याच्या निर्मिती संस्थेतील ‘फिर भी दिल हैं हिंदुस्तानी’ चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारलेली, जी काहीशी अशीच होती; त्यामुळे त्याला लगेच तशीच भूमिका साकारायची नव्हती”.