Shahrukh Khan Video Viral After Wins First National Award : बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खानने १९९२ मध्ये मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. सिनेमाचं स्वप्न उराशी बाळगून आणि गौरीवर असलेल्या प्रेमापोटी शाहरुख दिल्ली सोडून मुंबईत आला होता. सिनेविश्वात पाऊल ठेवल्यावर शाहरुखने एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे केले आणि कालांतराने तो बॉलीवूडचा ‘बादशहा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, किंग खानला गेल्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता.

अखेर त्याची ही इच्छा २३ सप्टेंबरला पूर्ण झाली असून, शाहरुख खानला नुकताच त्याच्या करिअरमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘जवान’ सिनेमासाठी किंग खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा सोहळा नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान शाहरुखची जिवलग मैत्रीण व प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यावर शाहरुख आपलं मेडल गळ्यात घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला ते जमत नव्हतं कारण, काही दिवसांपूर्वीच ‘किंग’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. आर्यनच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजच्या प्रमोशनला सुद्धा शाहरुख खानच्या हाताला प्लास्टर होतं. नुकतीच त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने शाहरुखला मेडल गळ्यात घालण्यासाठी लगेच राणी मुखर्जीने मदत केली.

पुरस्काररूपी मिळालेलं मेडल गळ्यात घातल्यावर शाहरुखने सर्वात आधी मागे बसलेल्या त्याच्या मॅनेजरकडे पाहिलं आणि तिला अभिमानाने हे मेडल दाखवलं. पूजाने शाहरुखचा सिनेविश्वातील प्रवास फार जवळून पाहिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून पूजा ददलानी शाहरुख व त्याच्या कुटुंबीयांची पर्सनल मॅनेजर आहे. चित्रपट निर्मात्यांना सुद्धा शाहरुखला भेटण्यासाठी सर्वात आधी पूजाशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे इतक्या वर्षांचं राष्ट्रीय पुरस्काराचं स्वप्न साकार होताच किंग खानने हे मेडल सर्वात आधी पूजाला दाखवलं.

शाहरुख-राणीच्या क्युट व्हिडीओसह त्याने पूजाला मेडल दाखवलेल्या या कृतीचं देखील सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. किंग खानला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर बॉलीवूडकरांनी शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. पत्नी गौरी खान, सुहाना व आर्यन खान, करण जोहर यामंडळींनी किंग खानसाठी खास पोस्ट शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.