Shah Rukh Khan and son Aryan Khan: अनेक वर्षांपासून अभिनयाच्या माध्यमातून बॉलीवूडच्या किंग खानने म्हणजेच शाहरुख खानने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता त्याचा मोठा मुलगा आर्यन खाननेदेखील मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले आहे.
शाहरुखच्या मुलाने जरी मनोरंजन सृष्टीत पहिले पाऊल टाकले असले तरी वडिलांपेक्षा त्याने वेगळा मार्ग निवडला आहे. त्याने अभिनयातून नाही, तर दिग्दर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड'(The Bads Of Bollywood) हा शो प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा लाँच सोहळा पार पडला. त्यामध्ये शाहरुख व गौरी खानही दिसले. तसेच, बॉलीवूडमधील काही कलाकार आर्यन खानच्या या लाँच सोहळ्यात हजर होते. त्यादरम्यान, त्याने मीडियाशी संवाद साधला.
शाहरुख खान व आर्यन खानचा व्हिडीओ व्हायरल
या सोहळ्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये आर्यन खानने एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांची मने जिंकली. आर्यन म्हणाला, “आज मी पहिल्यांदाच भाषण करणार असल्याने मला थोडी भीती वाटत आहे. तुमच्यासमोर पहिल्यांदाच स्टेजवर आलो आहे. त्यामुळेच मी गेले दोन दिवस आणि तीन रात्रींपासून हे भाषण मी सतत पाठ करत आहे.”
“मला खूप भीती वाटत होती की, म्हणून मी टेलिप्रॉम्प्टर इथे आणला आहे आणि जर समजा इथली लाइट गेली, तर म्हणून मी काही कागदांवरही माझं भाषण लिहून आणलं आहे. त्याच्याबरोबर एक बॅटरीसुद्धा आणली आहे. इतकं होऊनही माझ्याकडून चूक झालीच, तर माझे वडील आहेत.”
आर्यनचे हे वाक्य ऐकताच शाहरुख पुढे येतो, त्यावेळी त्याच्या शर्टावर मागच्या बाजूला एक कागद चिकटवलेला दिसत आहे. हे सगळं करूनही माझ्याकडून चूक झाली, तर कृपया मला माफ करा. कारण- मी हे सगळं पहिल्यांदाच करतोय.”
पुढे तो दोन-तीन वेळा सलग म्हणतो, “आता मी तुम्हा सगळ्यांना हे सांगू इच्छितो की, टेलिप्रॉम्पटर बंद झाला आहे. आता बोलण्यासाठी काहीही नाहीये. आता माझा शो बोलेल”, असे म्हणून तो हात जोडताना दिसत आहे.
खान कुटुंबाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करीत आर्यन खानवर कौतुकाच वर्षावर करताना दिसत आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
“शाहरुख खानसारखाच आवाज”, “तरुण शाहरुख खान”, “वडिलांची ओरिजनल कॉपी”, “आज पहिल्यांदा आर्यनला बोलताना पाहिले, खूप आनंद झाला”, “वडिलांची कार्बन कॉपी”, “सुंदर”, “शाहरुख खानची कॉपी आहे”, “त्याला त्याच्या वडिलांसारखाच तसाच आवाज कसा मिळाला?”, “शाहरुख खानपेक्षा जास्त छान दिसत आहे”, “हा झेरॉक्स नाही, हा तर कार्बन कॉपी आहे”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




आता आर्यन खानच्या शोला प्रेक्षकांचे प्रेम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.