करण जोहर आणि शाहरुख खान यांची खूप घट्ट मैत्री आहे. शाहरुख कधीच करणला सिनेमाची कथा विचारत नाही आणि दोघेही मानधनाबद्दलही चर्चा करत नाहीत. करणच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’चे बरेच चित्रपट फ्लॉप झाले होते, त्यावेळी एका हिट चित्रपटाची गरज होती. शाहरुख खानने ‘कल हो ना हो’ हा चित्रपट करून करणची मदत केली. शाहरुखने धर्माला कशी मदत केली याची आठवण चित्रपट निर्माते विवेक वासवानीने करून दिली.

विवेक वासवानीने रेडिओ नशाशी बोलताना सांगितलं की यश जोहर त्यावेळी कठीण काळातून जात होते. त्यांना एका हिट सिनेमाची गरज होती. त्यावेळी महेश भट्ट यांनी यश जोहरसाठी एक ऑफर आणली होती. त्या सिनेमात शाहरुख खानने मुख्य भूमिका केल्यास चित्रपट मोफत दिग्दर्शित करणार, असं महेश म्हणाले होते. विवेक व शाहरुख जवळचे मित्र होते. त्याने त्याच्या ‘कभी हान कभी ना’ या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती.

धर्मा प्रॉडक्शनचे फ्लॉप चित्रपट

“करण जोहरने मध्यरात्री मला फोन केला आणि म्हटलं की ‘माझे वडील मरतील.’ तेव्हा त्यांचे ‘गुमराह’, ‘दुनिया’ आणि ‘मुक्कदर का फैसला’ हे सर्व चित्रपट फ्लॉप झाले. ‘अग्निपथ’ फ्लॉप झाल्याने त्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. महेश भट्ट धर्मा प्रॉडक्शनसाठी पुढील चित्रपट मोफत करण्यास तयार आहे, पण त्यात त्यांना शाहरुख खान पाहिजे,” असं विवेक वासवानी म्हणाला.

यश जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची सुरुवात १९८० सालच्या ‘दोस्ताना’पासून झाली. त्यांचे ‘दुनिया’ (१९८४), ‘मुकद्दर का फैसला’ (१९८७), ‘गुमराह’ (१९९०) आणि ‘अग्निपथ’ (१९९०) हे सर्व चित्रपट फ्लॉप झाले. जोहर कुटुंबावर सर्वस्व गमावण्याची वेळ आली होती, पण १९९८ सालच्या ‘कुछ कुछ होता है’ ने परिस्थिती पूर्णपणे बदलली. करणने या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या यशानंतर या सिनेमाने शाहरुखच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. तो इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता झाला.

शाहरुख खान भडकला अन् मारायची दिली धमकी

विवेक वासवानीच्या मते, शाहरुख खानला महेश भट्टबरोबर काम करायचं नव्हतं. “मग मला समजलं शाहरुख भट्ट साहेबांबरोबर काम करू इच्छित नव्हता. फोनवर भांडणं होत होती. फिरोज खानचा असोसिएट डायरेक्टर वासी खान नावाचा एक माणूस होता. त्याने मला फोन केला. तेव्हा शाहरुखचा सेक्रेटरी फोनवर होता. वासी खान मला म्हणाला, ‘शाहरुख खानशी बोलण्यापासून रोखणारा तू कोण आहेस?’ शाहरुखने चुकून हे ऐकलं आणि त्याने फोन उचलला आणि त्याने दिल्लीतल्या काही वाईट शिव्या दिल्या. तो मला म्हणाला, ‘जर या माणसाने पुन्हा फोन केला तर मी जाऊन त्याला मारेन,'” असं विवेक म्हणाला.

शाहरुख खानने नंतर महेश भट्ट यांना सिनेमा न करण्याचं कारण पटवून दिलं होतं. “करणने मला फोन केला आणि म्हटलं की शाहरुख तयार झाल्यास महेश भट्ट मोफत काम करतील. शाहरुख मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता आणि मी त्याला विचारण्यासाठी तिथे गेलो. मी त्याला यश जोहरबद्दल सांगितलं आणि शाहरुख तयार झाला. पण भट्ट साहेबांचं नाव ऐकताच त्याने नकार दिला. मी शाहरुख खानला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर डुप्लिकेट चित्रपटबद्दल सगळं ठरलं. भट्ट साहेब चित्रपटाच्या सेटवर फारसे नव्हते आणि करण आणि शाहरुख यांनी तो चित्रपट बनवला होता,” असं विवेक वासवानी म्हणाला.