बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’, ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर ‘डंकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख बरोबर अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘डंकी’ चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि दोन गाणी आधीच प्रदर्शित झाली आहेत ज्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

नुकतंच चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून लोकांनी चांगला प्रतिसाद याला दिला आहे. उत्तरेकडील बऱ्याच राज्यात चित्रपटाला सर्वाधिक स्क्रीन्स मिळाल्या आहेत यामुळे तिथे हा चित्रपट चांगलीच कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. मुंबईमध्येसुद्धा शाहरुख खानच्या ‘डंकी’ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख आणि तापसीबरोबरच विक्रम कोचर हा अभिनेतासुद्धा महत्त्वाच्या अन् अत्यंत विनोदी भूमिकेत पाहायला मिळत आहे.

जेव्हा शाहरुखने प्रथम ‘डंकी’मधील कलाकारांना आपल्या घरी भेटायला बोलावलं त्यावेळच्या अनुभवाबद्दल विक्रमने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. ‘शोशा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विक्रम म्हणाला, “जेव्हा शाहरुख खान यांनी प्रथम आम्हाला त्यांच्या मुंबईच्या घरी ‘मन्नत’मध्ये बोलावलं तेव्हा आम्ही सगळे त्यांचं घर पाहून दंगच झालो. आम्ही एका लिफ्टमधून त्यांच्या घरात गेलो, तिथे प्रचंड सिक्युरिटी होती. तिथे एक मोठा हॉल आहे, प्रवेशद्वाराजवळ मोठी लॉबी आहे आणि तिथून पुढे विमानतळावर ज्या पद्धतीची सुरक्षा यंत्रणा असते तशी तिथे आहे. एकदा तुम्ही आत शिरलात की प्रत्येक गोष्ट तपासली जाते.”

आणखी वाचा : ‘डेडपूल ३’मध्ये झळकणार मिथुन चक्रवर्ती; व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच शाहरुख खानचं आदरातिथ्य हे काही वेगळंच आहे असंही विक्रमने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. शाहरुखबरोबर काम करताना एक मोकळेपणा जाणवतो असंही विक्रम मुलाखतीत म्हणाला होता. ‘डंकी’ २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विक्रम कोचर, विकी कौशल, बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षक किंग खानच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.