Shammi Kapoor Love Story: शम्मी कपूर हे भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचे बॉलीवूडमधील योगदान महत्त्वाचे आहे. १९५० ते १९७० या काळात त्यांनी भारतीय सिनेसृष्टीवर राज्य केले. त्यांना कोणीही स्पर्धक नव्हता. त्यांचा अभिनय, त्यांची स्टाइल, ज्या पद्धतीने ते भूमिका साकारत असत त्यांची आजही चर्चा होते. त्यांच्या कामाचे कौतुक होते.
शम्मी कपूर यांच्या प्रेमकहाण्यांचीदेखील मोठी चर्चा झाली. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर त्यांचे नाव जोडले गेले. त्यामध्ये गीता बाली, नूतन अशा अभिनेत्रींचेदेखील नाव आहे.
शम्मी कपूर व नूतन
शम्मी कपूर हे लहानपणापासूनच नूतन यांच्या प्रेमात होते असे म्हटले जाते. ते दोघेही एकत्रच वाढले, कारण त्यांची घरे शेजारी होती. दोन्ही कुटुंबातील संबंधदेखील उत्तम असल्याने त्यांच्यातील जवळिकता वाढत गेली. जेव्हा ते मोठे झाले, तेव्हा त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान नूतन यांची आई व वडील वेगळे झाले. नूतन यांची आई शोभना त्यांचा मित्र मोतीलाल यांच्यावर विश्वास ठेवत असे.
जेव्हा नूतन यांच्या आईने शम्मी व नूतन यांच्या लग्नाबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी या लग्नाला नकार दिला. त्यानंतर शोभना यांनी नूतन यांना पुढच्या शिक्षणासाठी स्वित्झर्लँडला पाठवले. अशाप्रकारे शम्मी कपूर व नूतन यांच्या प्रेमाचा शेवट झाला.
शम्मी आणि नादिया
१९५३ मध्ये शम्मी कपूर त्यांच्या भावांबरोबर श्रीलंकेला गेले होते. तिथे त्यांनी एका हॉटेलमध्ये कॅबरेचा कार्यक्रम पाहिला. तिथे त्यांची भेट नादिया गमाल यांच्याशी झाली. शम्मी त्यांच्या प्रेमात पडले. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी१७ वर्षांच्या नादियाला प्रपोज केले. नादिया म्हणालेल्या की त्या पाच वर्षे वाट पाहतील. जर या पाच वर्षांत त्यांच्यात प्रेम राहिले तर भविष्यात लग्न करतील. या दौऱ्यानंतर नादिया मुंबई आणि नंतर इजिप्तला गेल्या. दुसरीकडे शम्मी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाले, त्यांचा हळूहळू संपर्क तुटला आणि ते वेगळे झाले.
शम्मी कपूर आणि गीता बाली
शम्मी कपूर आणि गीता बाली यांची भेट १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीन रातें’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या चित्रपटाचे शूटिंग कुमाऊं येथे झाले होते. शूटिंग संपल्यावर हे कलाकार मुंबईत परतले. पण, प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हते. मात्र, २३ ऑगस्ट १९५५ ला गीता बाली यांनी शम्मी कपूर यांना अचानक लग्न करण्याबाबत विचारले. दुसऱ्याच दिवशी २४ ऑगस्ट १९५५ ला मुंबईतील बाणगंगा मंदिरात शम्मी कपूर आणि गीता बाली यांचे लग्न झाले. याबाबत त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितले नव्हते.
शम्मी कपूर यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले होते की गीताने पर्समधून लिपस्टिक काढली आणि सिंदूर म्हणून ती कपाळावर लावण्यास सांगितली. शम्मी कपूर यांना आदित्य व कांचन अशी दोन मुले आहेत.