९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने लग्नानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. लग्नानंतर ती बँकर पतीबरोबर विदेशात गेली होती. शिल्पा अलीकडेच बिग बॉस हिंदीमध्ये झळकली होती. त्यानंतर आता ती फिल्म इंडस्ट्रीत पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. लवकरच ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
शिल्पाने अमिताभ बच्चन, रजनीकांत या दिग्गजांबरोबर तसेच अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासह चित्रपट केले. शिल्पाने या सर्वांबरोबर काम करण्याचे अनुभव सांगितले. अजय देवगण सेटवर खोड्या करायचा, त्याचा शिमल्यातील एक किस्साही शिल्पाने पिंकव्हिलाशी बोलताना शेअर केला.
शिल्पाने दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचे कौतुक केले आणि त्यांच्याबरोबर कामाचा अनुभव सांगितला. रजनीकांत मराठीत बोलायचे, असं शिल्पा म्हणाली. तसेच अक्षय कुमार व अजय देवगण सेटवर खूप खोड्या करायचे, असंही शिल्पाने नमूद केलं. “अजय खूप खोड्या करायचा. आम्ही शिमल्यात शूटिंग करत होतो, त्याने हॉटेलमधील भूत आहे, अशी एक कथा रचली. मध्यरात्री कोणीतरी माझ्या खोलीचे दार ठोठावले, मी माझे आई-वडील आणि हेअर ड्रेसरबरोबर खोलीत होते. मी पाहिलं की एक जण पांढरी चादर अंगावर घेऊन लॉबीमध्ये धावत आहे आणि आम्हाला सकाळी समजलं की तो अजय देवगण होता,” असा किस्सा शिल्पाने सांगितला.
अक्षय घड्याळ चोरून लपवायचा – शिल्पा शिरोडकर
शिल्पाने अक्षय कुमार सेटवर मस्ती करायचा, त्याबद्दलही सांगितलं. “अक्षय लोकांची घड्याळे चोरायचा आणि लपवून ठेवायचा. तो कोणाचे तरी घड्याळ गायब करायचा आणि मग मला त्या व्यक्तीला वेळ विचारायला सांगायचा. मला तो प्रँक करतोय याबद्दल माहीत नसायचं, त्यामुळे मी गोंधळायचे. मी वेळ विचारल्यावर घड्याळ नाही हे लक्षात आल्यावर ती व्यक्ती घड्याळ शोधायची. असंच बराच वेळ चालायचं आणि यामुळे शूटिंग उशीरा सुरू व्हायची. पण सेटवर खूप धमाल असायची,” असं शिल्पा शिरोडकर म्हणाली.