Smita Patil Final Moments: मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी अमिताभ बच्चन सारख्या बॉलीवूडमधील दिग्गजांबरोबर काम केलं आहे. त्यांनी अलीकडेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलबरोबर काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला. दीपक यांनी स्मिताच्या पार्थिवाचा मेकअप केला होता. स्मिताची इच्छा विवाहिता म्हणून अखेरचा श्वास घ्यायची होती, त्याबद्दल दीपक सावंत यांनी सांगितलं.
रील मीट्स रियल या युट्यूब चॅनलशी बोलताना दीपक म्हणाले, “स्मिता पाटील अनेकदा म्हणायच्या की निधनानंतर त्यांच्यावर वधूच्या रुपात अंत्यसंस्कार करण्यात यावे. मी त्यांना रागवायचो की असं बोलू नये. त्या त्यांच्या आईलाही असंच म्हणायच्या, त्याही त्यांच्यावर रागवायच्या.”
स्मिता पाटीलच्या पार्थिवाचा मेकअप करताना रडले होते दीपक सावंत
दीपकला स्मिताचा शेवटचा मेकअप करण्यापूर्वी अश्रू अनावर झाले होते. तिच्या शेवटच्या दिवसाची आठवण सांगत म्हणाले, “स्मिताच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण शिकागोहून येणार होती आणि तिला येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले. या काळात तिचे शरीर बर्फावर ठेवले होते. स्मिताच्या आईने मला मेकअप किट दिली. अमिताभ बच्चन आणि इतर लोक तिथे बसले होते. त्यांनी त्यांच्यासमोर मेकअप किट मला दिले आणि म्हणाल्या की ‘तिची इच्छा विवाहित स्त्री म्हणून मरण्याची होती, त्यामुळे ती तिला तयार कर.’ मी रडू लागलो आणि रडत रडत मी त्यांचा मेकअप केला. त्यांच्या इच्छेप्रमाणे मी त्यांचा शेवटचा मेकअप केला होता.”
दरम्यान, राज बब्बर नादिराशी विवाहित असताना स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा झाला, तो म्हणजे प्रतीक बब्बर. बाळंतपणादरम्यान स्मिताची प्रकृती बिघडली आणि काही दिवसांनी तिचे निधन झाले. त्यानंतर राज पहिली पत्नी नादिराकडे परतला. स्मिताने २८ नोव्हेंबर रोजी प्रतीक बब्बरचे स्वागत केले आणि १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.

तिच्या डोळ्यांत अश्रू होते अन्…
रेडिफ.कॉमला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत राज बब्बर यांनी स्मिताच्या शेवटच्या क्षणांची आठवण करून दिली होती. “घरापासून ते हॉस्पिटलपर्यंत, ती सतत माफी मागत होती आणि मी तिला सांगितलं की सर्व काही ठीक होईल. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांनी मला सगळं सांगितलं. एका तासानंतर, डॉक्टर आले आणि मला सांगितलं की ती कोमात गेली आहे,” असं राज बब्बर म्हणाले होते.
“मी तिचा एक भाग होतो आणि ती माझा एक भाग होती. तुम्ही स्वतःला कितीही धाडसी म्हणत असाल तरी आयुष्यभर तुमच्या हृदयाचा आणि आत्म्याचा भाग असलेल्या व्यक्तीची आठवण येणं स्वाभाविक आहे. ती आणि तिच्या आठवणी माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या आयुष्याचा एक भाग राहतील,” असं राज बब्बर म्हणाले होते.