ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील दृश्य आणि संवादावरुन अनेकांनी चित्रपटावर टीका केली आहे. चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आल्याबाबत नेपाळने आक्षेप व्यक्त केला आहे. परिणामी नेपाळने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी कोणतेही भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळने चित्रपटावर बंदी घातल्यानंतर T-Series ने काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीचे महापौर बालेन शाह आणि नेपाळच्या चित्रपट विकास मंडळाला माफीनामा-पत्र लिहिले आहे. पत्रात टी-सीरिजच्या वतीने माफी मागण्याबरोबरच नेपाळ चित्रपट विकास मंडळाने याकडे एक कला म्हणून पाहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा- “वाद निर्माण करण्यासाठी…,” ‘आदिपुरुष’मधील संवादांवरुन होणाऱ्या टीकेवर तेजस्विनी पंडितचं भाष्य, म्हणाली…

काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटी आणि नेपाळच्या फिल्म डेव्हलपमेंट बोर्डाचे महापौर बालेन शाह यांना लिहिलेल्या पत्रात टी-सीरिजने लिहिले आहे- ‘आदरणीय सर, जर आम्हाला कोणत्याही प्रकारे नेपाळच्या लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर सर्वप्रथम आम्ही दिलगीर आहोत. हे जाणूनबुजून कोणाच्याही मनात तेढ निर्माण करण्यासाठी करण्यात आलेले नाही.

नेमका वाद काय?

‘आदिपुरुष’मध्ये सीतेच्या जन्माबाबत करण्यात आलेल्या दाव्यांवरून नेपाळमध्ये वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आला आहे. मात्र, नेपाळ सरकारच्या मते, सीतेचा जन्म नेपाळच्या तराई प्रदेशातील जनकपूर इथं झाला होता. तर भारतात सीतेचा जन्म सीतामढी इथे झाला, असं मानलं जातं. या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये नेहमीच वाद होत आले आहेत. ‘आदिपुरुष’चे निर्माते सीतेच्या जन्माच्या ठिकाणाच्या नावाची दुरुस्ती करेपर्यंत हा चित्रपट चालवणार नाही, असे काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी ट्वीट करीत इशारा दिला होता.