सध्या जगभरातल्या क्रिकेटच्या चाहत्यांचे लक्ष आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या सामन्याकडे लागले आहे. आज उपांत्य फेरीच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारत आणि इंग्लंड हे संघ एकमेकांसमोर येणार आहेत. काल बाबर आझमच्या पाकिस्तान संघाने सात गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे जर आज भारताने इंग्लंडचा पराभव केला, तर १३ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येतील.
दरम्यान या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर यासंबंधित मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. चाहत्यांनी भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याचा संबंध आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाशी लावून अनेक मीम्स तयार केले आहेत. भारतीय गोलंदाज अमित मिश्रानेदेखील लगानचा संदर्भ लावून एक पोस्ट शेअर केली होती. तर नेटफ्लिक्नने ‘गुरुवारी लगानचा रिमेक पाहायला मिळणार आहे’, असे ट्वीट केले होते.
आयपीएलमधील सनरायइर्स हैदराबादच्या संघाने त्यांच्या फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो ‘लगान’ चित्रपटाचा असून त्यामध्ये आमिर खानसह बाकी अभिनेत्यांच्या चेहऱ्यांच्या जागी भारतीय संघातील क्रिकेटपटूंचे चेहरे लावले आहेत. फोटोमध्ये ‘लगान’ चित्रपटामधल्या चंपानेर गावाच्या जागी ‘ॲडलेड’ या जागेचा उल्लेख करण्यात आला आहे. आजचा सामना ॲडलेड ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे.
आणखी वाचा – “ए निली जर्सी वालो, १३० करोड सपनो के रखवालो…” भारत विरुद्ध इंग्लडच्या सामन्यापूर्वी अमिताभ बच्चन यांची कविता चर्चेत
२००७ मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्ंयादा विजेतेपद पटकावले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती यंदाच्या अंतिम सामन्यामध्ये व्हावी अशी भारतीय समर्थकांची इच्छा आहे. पण त्याआधी भारताला आज होणाऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडला पराभूत करावे लागणार आहे. या सामन्यामध्ये भारताचं परडं इंग्लंडपेक्षा काहीसं जड असल्याचं दिसत आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही भारतीय संघ उजवा आहे.