बॉलीवूड अभिनेता सलमान नेहमीच चर्चेत असतो. याच बॉलीवूड सुपरस्टार असलेल्या अभिनेत्याला गेल्या वर्षी लॉरेन्स टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता सलमान खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या दोन्ही आऱोपींना अटक केली आहे.
पनवेलमध्ये सलमानचे मोठे फार्महाऊस आहे. सलमान व त्याचे कुटुंबीय अनेकदा सुट्टी व्यतीत करण्यासाठी त्या फार्महाऊसवर जात असतात. माथेरानच्या मागील डोंगरांच्या भागात सलमानचे हे आलिशान फार्महाउस आहे. या फार्महाऊसभोवती तारेचे कुंपण आहे. हे दोन्ही आरोपी तारेचे हे कुंपण तोडून फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. फार्महाऊसच्या सुरक्षा रक्षकांना ही बाब लक्षात येताच, त्यांनी दोघांनाही पकडले आणि पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तारा तोडून सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सलमान खान फार्महाऊसवर उपस्थित नव्हता. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी स्वतःला सलमान खानचे चाहते असल्याचे सांगितले आहे. दोन्ही आरोपींकडे पोलिसांना बनावट ओळखपत्रेही सापडली आहेत, मात्र त्यांच्याकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आलेले नाही.
हेही वाचा- ‘खल्लास गर्ल’चा १४ वर्षांचा संसार मोडला, पतीने घटस्फोटाबाबत सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही दोघेही आता…”
अजेश कुमार गिल व गुरुसेवक, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकशीदरम्यान हे दोघेही पंजाब आणि राजस्थान येथील असल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघे सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा का प्रयत्न करीत होते याची चौकशी पोलीस करीत आहेत. मात्र, या प्रकारामुळे सलमानचे चाहते चिंतेत पडले आहेत.