Varun Dhawan travels by Pune Metro: अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर’ सिनेमा १९९७ ला प्रदर्शित झाला. या सिनेमाचे मोठे कौतुक झाले होते. सनी देओल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. आता लवकरच या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वरुण धवननेपुण्याच्या मेट्रोने केला प्रवास
‘बॉर्डर २‘ च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अभय शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग विविध राज्यांत होत आहे. सध्या पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)मध्ये हे शूटिंग सुरू आहे. आता या सगळ्यात अभिनेता वरुण धवन व अभय शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.
वरुण धवन व अभय शेट्टी यांनी नुकतीच पुण्याच्या मेट्रोतून प्रवास केला. अहान शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अहान शेट्टी, वरुण धवन दिसत आहे. वरुण धवन म्हणतो की, आम्ही सध्या पुण्यात आहोत. आम्ही हरवलो आहोत, तर आम्ही आता मेट्रोमधून प्रवास करीत हॉटेलपर्यंत पोहोचणार आहोत. त्यानंतर ते पुण्याच्या मेट्रोमधून प्रवास करताना दिसत आहेत. त्यांनी यादरम्यान चेहर्यावर मास्क लावला आहे. त्यांनी काही वेळ बसून, तर काही वेळ गर्दीत उभे राहून प्रवास केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मेट्रो स्टेशन आणि मेट्रोमधील दृश्ये पाहायला मिळत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना अहानने त्यावर रेल गाडी हे गाणे लावले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता पुष्कर जोगने पुणे, अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केली आहे. सुनील शेट्टीने लव्ह इट, अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “मी तुम्हाला भेटण्याची संधी गमावली”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “एकाचा जरी मास्क निघाला असता, तर मजा आली असती. मग दृश्य वेगळे असते”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “पुणे मेट्रो”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मी त्यावेळी मेट्रोने का प्रवास करत नव्हते” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
याआधी ‘बॉर्डर २’ टीमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये वरुण धवन, सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ व भूषण कुमार दिसले होते.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करीत आहेत आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता व निधी दत्ता यांनी निर्मिती केली आहे. ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.