Know Net Worth of India’s 58th richest man: मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी काही चित्रपटात काम केल्यानंतर करिअरचा वेगळा पर्याय निवडला. यामध्ये अभिनेत्री मयूरी कांगो, अभिनेता उदय चोप्रा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये अभिनेत्री गायत्री जोशीचा देखील समावेश आहे.
गायत्री जोशी कोण आहे?
गायत्री जोशीबद्दल बोलायचे तर तिने २००० मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला आणि त्यानंतर मिस इंटरनॅशनल २००० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
याबरोबरच, गायत्री जोशी २००४ साली प्रदर्शित झालेल्या स्वदेश चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटात तिने गीता ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. हा चित्रपट खूप गाजला. मात्र, या चित्रपटानंतर अभिनेत्री पडद्यावर दिसली नाही.
गायत्री जोशी सध्या काय करते?
गायत्रीने २००५ साली उद्योगपती विकास ओबेरॉयबरोबर लग्न केले आणि अभिनय क्षेत्रात काम करणे सोडले. सध्या ती विकास ओबेरॉयच्या कंपनीत महत्वाच्या पदावर आहे. ती ओबेरॉय रिअल्टीमध्ये काम करत आहे. पण, आता गायत्री जोशी का चर्चेत आली आहे? हे जाणून घेऊयात…
हुरुन रिच इंडिया लिस्ट १ ऑक्टोबर २०२५ ला जाहीर झाली. या यादीत भारतातील उद्योगपतींची नावे पाहायला मिळत आहेत. मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबाचे नाव पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हुरुन रिच इंडिया लिस्टमध्ये मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर
बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या यादीत समाविष्ट झाली आहेत. रिपोर्ट्सनुसार, आता भारतात ३५० हून अधिक व्यक्ती अब्जाधीश आहेत. यावर्षी ५८ नवीन व्यक्तींचा अब्जाधीश म्हणून समावेश झाला आहे. शाहरुख खानला हुरुन रिच इंडिया लिस्टमध्ये पहिल्यांदाच अब्जाधीश म्हणून मान्यता मिळाली आहे.
त्याची संपत्ती १२, ४९० कोटी म्हणजेच १. ४ अब्ज आहे. जरी शाहरुख खान बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला असला आणि श्रीमंत कलाकारांच्या यादीत त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर असले तरी संपूर्ण श्रीमंताच्या यादीत तो टॉप १०० श्रीमंत व्यक्तींमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करू शकला नाही.
गायत्री जोशीचा पती श्रीमंताच्या यादीत ५८ व्या स्थानावर
विशेष म्हणजे बॉलीवूडशी संबंध असलेल्या एका व्यक्तीने टॉप १०० मध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुखची स्वदेस चित्रपटातील सहअभिनेत्री गायत्री जोशीचे पती विकास ओबेरॉय आहेत. विकास ओबेरॉय यांची संपत्ती ४२,९६० कोटी इतकी आहे. या संपत्तीसह ते ५८ व्या स्थानावर आहेत. इतकेच नाही तर भारतातील रिअल इस्टेट उद्योग्यात ते चौथ्या स्थानावर आहेत.
विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रिअल्टीचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या अशा ३६० वेस्ट अपार्टमेंट या प्रोजेक्टची मोठी चर्चा होताना दिसते. येथील एका लक्झरी फ्लॅटची किंमत ४०० कोटी रुपयांपर्यंत आहे. या ठिकाणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपती राहतात. याबरोबरच, ओबेरॉय रिअल्टीकडे वेस्टिन हे लक्झरी हॉटेल आणि अनेक लक्झरी प्रकल्प आहेत.
बॉलीवूडच्या पाच श्रीमंत कलाकारांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा विकास ओबेरॉयची जास्त संपत्ती
बॉलीवूडमधील पाच श्रीमंत कलाकारांबद्दल बोलायचे तर अभिनेता शाहरुख खान पहिल्या स्थानावर आहे, दुसऱ्या स्थानावर जुही चावला, तिसऱ्या स्थानावर हृतिक रोशन, चौथ्या स्थानावर करण जोहर आणि पाचव्या स्थानावर बच्चन कुटुंब आहे.
या पाच जणांची एकत्रित संपत्ती २५९०० कोटी इतकी आहे. तर विकास ओबेरॉय यांची एकट्याची संपत्ती ४२,९६० कोटी आहे. या यादीत सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर तसेच लोकप्रिय निर्माता आदित्य चोप्रा यांना स्थान मिळाले नाही.