This Bollywood Actor Was Jealous Of Amitabh Bachchan Success : अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. ९०च्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यावेळी त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. परंतु, यामुळे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांना त्यांचा हेवा वाटायचा.

अभिनयक्षेत्रात नेहमीच खूप स्पर्धा असते असं म्हटलं जातं, त्यामुळे काहीवेळा कलाकारांचीसुद्धा आपआपसात स्पर्धा असते. अमिताभ बच्चन यांना मिळणाऱ्या यशामुळे लोकप्रिय अभिनेते विनोद खन्ना यांना त्यांचा हेवा वाटायचा, असं त्यांच्या जवळच्या मित्राने एक मुलाखतीत सांगितलं आहे. विनोद खन्ना ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. परंतु, यशाच्या शिखरावर असताना त्यांनी हे सर्व सोडून ओशोंचे अनुयायी होण्याचा निर्णय घेतला. ओशो, जे भगवान रजनीश म्हणूनही ओळखले जायचे. परंतु, काही काळ तिथे घालवल्यानंतर विनोद खन्ना पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले.

ओशोंचे भाऊ स्वामी शैलेंद्र सरस्वती यांनी नुकतीच ‘गलाटा इंडिया’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी विनोद खन्ना यांच्याबद्दल सांगितलं आहे. ते विनोद खन्ना यांना जवळून ओळखायचे व ते त्यांच्या घराजवळच्या परिसरातच राहायचे असं म्हटलं आहे. विनोद खन्नाबद्दल ते म्हणाले, “मला माहीत आहे तो कोणत्या परिस्थितीतून जात होता ते. लोकांना असं वाटतं की एक यशस्वी पुरुष प्रत्येक गोष्टीत यशस्वी होत असतो, परंतु तसं नसतं. ते अनेक आव्हानात्मक गोष्टींमधून जात असतात, ज्याबद्दल फक्त त्यांनाच माहीत असते.”

विनोद खन्ना यांना अमिताभ बच्चन यांचा वाटायचा हेवा

विनोद खन्ना यांच्याबद्दल ते पुढे म्हणाले, विनोद खन्ना अनेकदा रडायचे. त्यांना त्यांच्या पत्नीची व मुलांची खूप आठवण यायची. परंतु, हे कारण नव्हतं. ते म्हणाले, विनोद यांना अमिताभ बच्चन यांचा हेवा वाटायचा आणि ते अमिताभ यांना स्पर्धक म्हणून बघायचे. विनोद खन्ना यांनी इंडस्ट्री सोडल्यानंतर अमिताभ यांची इंडस्ट्रीत खूप चर्चा होती.

विनोद खन्ना यांना त्यावेळी ओशोंनी विरोधी पक्षात प्रवेश करून अमिताभ बच्चन यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता. याबद्दल त्यांचे भाऊ म्हणाले, “विनोद खन्ना हे ऐकल्यानंतर खचले होते. ते म्हणालेले, मला राजकारणात रस नाही, मला फक्त माझ्या कुटुंबाची आठवण येत आहे.” त्यावेळी ओशो त्यांना म्हणालेले, “हे तू बोलत नाहीयेस. तू दुःख लपवत आहेस आणि मला ते माहीत आहे. तुला तुझ्या कुटुंबाची आठवण येत आहे असं जरी म्हणत असलास तरी तुला फक्त अमिताभ बच्चनचा हेवा वाटत आहे, तू त्याच्या विरोधात भांडायला हवं.”

शैलेंद्र सरस्वती यांनी दावा केला की, “विनोद खन्ना भारतात परतले तेव्हा ते त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात नव्हते, ज्यांची आठवण येत आहे असं त्यांनी सांगितलेलं. ते दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडले. नंतर विनोद म्हणालेले की, ओशोंनी बरोबर सांगितलं होतं, मला माझ्या मुलांची किंवा पत्नीची आठवण येत नव्हती.”