Anushka Sharma and Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने लखनौवर दणदणीत विजय मिळवत क्वालिफायर १ मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. जितेश शर्माच्या वादळी खेळीमुळे आरसीबीला हा सामना सहज जिंकता आला. त्याने ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ८५ धावा केल्या. याशिवाय आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात ५४ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
RCB च्या विजयानंतर विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ड्रेसिंग रुममधून सेलिब्रेशन करतच कोहली बाहेर पडला होता. याशिवाय या सामन्याला त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती. अनुष्का स्टेडियमवर उपस्थित असते तेव्हा विरुष्काचे अनेक गोड क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अनुष्का सामन्यादरम्यान नेहमीच विराटला चिअर करताना दिसते. RCB च्या विजयानंतर सगळे खेळाडू जल्लोष करत मैदानावर आले होते. यावेळी विराटने स्टँड्समध्ये बसलेल्या अनुष्काकडे पाहिलं आणि तिला फ्लाइंग किस दिलं. अभिनेत्री सुरुवातीला काहिशी लाजली आणि त्यानंतर लगेच तिने देखील पतीला फ्लाइंग किस देत आपला आनंद व्यक्त केला.
विरुष्काच्या क्यूट रोमान्सचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनुष्का नेहमीच RCB च्या सामन्यांना उपस्थित असते आणि संघाला पाठिंबा देते. काही दिवसांपूर्वीच विरुष्काचा RCB च्या कॅम्पमध्ये पिकलबॉल खेळतानाचा व्हिडीओ देखील चर्चेत आला होता.
दरम्यान, विराट कोहली व अनुष्का शर्माचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विराटने टेस्टमधून निवृत्ती जाहीर केल्यावर अनुष्काने भावुक पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं होतं. यानंतर हे जोडपं वृंदावनला पोहोचलं होतं. याशिवाय विरुष्काने काही दिवसांपूर्वीच अयोध्येतील राम मंदिर आणि हनुमान गढीला भेट देऊन दर्शन घेतलं. या दोघांचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.