Emraan Hashmi Education: इमरान हाश्मी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘आशिक बनाया आपने’, ‘मर्डर’, ‘एक थी डायन’, ‘दिल तो बच्च है जी’, ‘टायगर ४’, ‘ग्राऊंड झिरो’, ‘ये वतन मेरे वतन’ अशा चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

अभिनेता लवकरच हक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेपासून प्रेरित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमदेखील प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

इमरान हाश्मीच्या चित्रपटांबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्याचे शिक्षण किती झाले आहे, हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण अभिनेत्याच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊ…

मुंबईच्या ‘या’ कॉलेजमधून घेतली आहे पदवी

इमरान हाश्मीचा जन्म २४ मार्च १९७९ मध्ये झाला. जमनाबाई नरसी या शाळेत त्याने शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.यानंतर अभिनेत्याने मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

वडील सय्यद अन्वर हाश्मी हे एक व्यावसायिक आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. इमरान हाश्मीने ‘फूटपाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले. पण त्याला खरी लोकप्रियता त्याच्या ‘जन्नत २’ चित्रपटातून मिळाली. यानंतर इमरान हाश्मीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

यामी गौतमच्या शिक्षणाबद्दल बोलायचे तर यामी गौतमने चंदिगडमधील यादविंद्र पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर तिने पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला. काही रिपोर्टसनुसार, यामीला कॉलेजमध्ये शिकत असताना आयएएस अधिकारी व्हायचे होते. ती लॉ ऑनर्सचे शिक्षण घेत होती. मात्र, अभिनय क्षेत्राकडे वळल्यानंतर तिने तिचे शिक्षण सोडले.

इमरान हाश्मी व यामी गौतमचा ‘हक’ हा नवीन चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.